दिवाळीच्या उत्सवात मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर आली आहे. टेलिव्हिजन, चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अमेरिकन अभिनेते स्टेसी कीच यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्टेसी कीच हे दीर्घकाळापासून हृदयाशी संबंधित गंभीर आजाराने आणि हृदय निकामी होण्याच्या समस्येने त्रस्त होते. ही दुःखद बातमी त्यांच्या पत्नीने जड अंतकरणाने दिली. अभिनेत्याच्या निधनाची बातमी समजताच चाहते आणि कलाकार मंडळींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्याची कारकीर्द
स्टेसी कीच यांनी अभिनय आणि साहित्याचे औपचारिक शिक्षण घेतले होते. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे इंग्रजी आणि नाट्यकलेचा अभ्यास केला, त्यानंतर ते ‘येल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये दाखल झाले. पुढे त्यांना ‘फुलब्राइट स्कॉलरशिप’ मिळाली, ज्याद्वारे त्यांनी ‘लंडन अकॅडमी ऑफ म्युझिक अँड ड्रॅमॅटिक आर्ट’मध्ये शिक्षण घेतले.
स्टेसी कीच यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी साकारलेली ‘माईक हॅमर’ ही खाजगी गुप्तहेराची भूमिका होय. कीच यांनी १९८३ मधील ‘मर्डर मी, मर्डर यू’ या टेलिव्हिजन चित्रपटाद्वारे पहिल्यांदा या गुप्तहेराची भूमिका साकारली आणि त्यानंतरच्या अनेक टेलिव्हिजन निर्मितींमध्येही त्यांनी हे पात्र निभावले. १९८४ मध्ये सुरू झालेल्या ‘मिकी स्पिलेन्स माईक हॅमर’ या मालिकेमुळे अभिनेते विशेष लोकप्रिय झाले.
जॉन हस्टन यांच्या १९७२ च्या ‘फॅट सिटी’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयासाठी त्यांनी समीक्षकांची प्रशंसा मिळवली. या चित्रपटात त्यांनी बिली टली नावाच्या एका संघर्षशील बॉक्सरची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते ‘द लाँग रायडर्स’, ‘द नाइन्थ कॉन्फिगरेशन’, ‘अमेरिकन हिस्ट्री एक्स’, ‘नेब्रास्का’ आणि ‘द बॉर्न लेगसी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसले.
दूरचित्रवाणीवर कीच यांनी ‘प्रिझन ब्रेक’मधील वॉर्डन हेन्री पोपच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यांनी ‘टायटस’ या सिटकॉममध्ये केन टायटसची भूमिका साकारली आणि ‘ब्लू ब्लड्स’मध्ये कार्डिनल केविन केर्न्सच्या भूमिकेत दिसले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर, स्टेसी कीच यांच्या पत्नीचे नाव माल्गोसिया टोमासी असे आहे. त्यांना शॅनन आणि कॅरोलिना ही दोन मुले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply