भाऊबीज साजरी करण्यासाठीचा प्रवास, दिवाळीचा फराळ घेऊन नातेवाइकांच्या घरी जाण्याची घाई आणि सणासुदीच्या काळात सहकुटुंब रात्री उशिरा बाहेर जेवण करून घरी परतण्याची धावपळ — अशा वेळी ॲपवर टॅक्सी बुक केली की काही मिनिटांत गाडी मिळेल, अशी प्रवाशांची अपेक्षा असते. मात्र प्रत्यक्षात राइड स्वीकारण्यासाठी अतिरिक्त पैसे देण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. अनेकदा राइड स्वीकारल्यानंतर अवघ्या एक-दोन मिनिटांच्या अंतरावर आलेले वाहन अचानक थांबते आणि चालकाकडून अतिरिक्त टिपची मागणी केली जाते. पैसे देण्यास नकार दिल्यास थेट बुकिंग रद्द केले जाते. दिवाळीच्या सणात प्रवाशांच्या सोयीसाठी असलेली ॲप आधारित टॅक्सीसेवा चालकांच्या या वागणुकीमुळे डोकेदुखी ठरत आहे.
भाड्याव्यतिरिक्त रकमेची मागणी आणि तक्रारी
ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या ॲप आधारित प्रवासी सेवा कंपन्यांकडून प्रवासाचे भाडे आधीच निश्चित करून दाखवले जाते आणि त्यानुसार प्रवासी राइड बुक करतात. मात्र बुकिंग स्वीकारल्यानंतर काही चालकांकडून ॲपवर दर्शवलेल्या भाड्याव्यतिरिक्त अतिरिक्त रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः विमानतळ, रेल्वे स्थानके, व्यापारी केंद्रे आणि गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार अधिक जाणवत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या काळात बाजारपेठा, मॉल, नातेवाइकांकडे आणि पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढते. सार्वजनिक वाहतुकीतील गर्दी टाळण्यासाठी अनेकजण ॲप आधारित टॅक्सीचा पर्याय निवडतात. मात्र याच गर्दीचा फायदा घेत काही चालकांकडून अतिरिक्त पैशांची मागणी केली जाते. चालकाने राइड स्वीकारल्यानंतर प्रवाशाला दुसरे वाहन मिळण्याची खात्री नसते; त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी किंवा ऐन गर्दीत होणारी गैरसोय टाळण्यासाठी अनेकजण नाइलाजाने अतिरिक्त रक्कम देतात.
प्रवाशांना मनस्ताप; कारवाईची मागणी
राइड स्वीकारल्यानंतर चालकांनी प्रवासाच्या अटी बदलणे हा प्रवाशांसाठी मनस्तापाचा प्रकार आहे. ॲपवर दाखवलेल्या भाडेदरानुसार प्रवास करण्याची तयारी असतानाही चालकांकडून वेगळी रक्कम मागितली जाते. मागणी मान्य न केल्यास चालक स्वतःहून राइड रद्द करतात. परिणामी प्रवाशांना पुन्हा वाहन शोधावे लागते आणि ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागतो. मुलुंड येथील रहिवासी दिनेश कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, राइड स्वीकारल्यानंतर चालकांनी अतिरिक्त पैशांची मागणी करणे आणि पैसे न दिल्यास बुकिंग रद्द करणे चुकीचे आहे. ॲपवर निश्चित झालेले भाडे देण्याची प्रवाशांची तयारी असते; मात्र प्रत्येक वेळी चालकांशी अतिरिक्त पैशांवरून वाद घालावा लागतो. तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याने चालकांचे धाडस वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राइड स्वीकारल्यानंतर अतिरिक्त रकमेची मागणी करणे किंवा मनमानीपणे बुकिंग रद्द करणे यावर ॲप कंपन्यांचे नियंत्रण असणे अपेक्षित आहे. प्रवासापूर्वी टिप मागण्यास मनाई असून ती ऐच्छिक असते आणि प्रवास पूर्ण झाल्यानंतरच ती देण्याची सुविधा असावी, अशा केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे मागितले जात आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन विभागाने या तक्रारींची दखल घेऊन संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply