परळीत दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे एकाच व्यासपीठावर आले. या कार्यक्रमात अंधारे यांनी केलेल्या एका वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाऊबीजेच्या निमित्ताने त्यांनी धनंजय मुंडे यांना जाहीर व्यासपीठावरून शुभेच्छा दिल्या.
परळीतील एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यात हे दोघे एकत्र आले होते. आपल्या मनोगतात सुषमा अंधारे यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा देताना मिश्किल आणि राजकीय वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा उल्लेख माजी मंत्री असा करताना काहीतरी वेगळेच वाटते.
‘पुढच्या दिवाळीला मंत्री म्हणूनच उल्लेख करेन’
भाऊ म्हणून धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देताना अंधारे म्हणाल्या, “इडा-पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे.” त्यानंतर त्या मिश्किलपणे म्हणाल्या की, “मी मात्र इडा-पिडा जाऊ दे आणि भाऊचं राज येऊ दे, असे म्हणेन. पुढच्या दिवाळीला तुमचा उल्लेख मंत्री म्हणूनच करेन.” त्यांच्या या सूचक वक्तव्याने उपस्थितांचे लक्ष वेधले.
वक्तव्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ
अंधारे यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमात चर्चेला उधाण आले. राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच अंधारे यांनी मुंडे यांच्याबाबत केलेले हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. भाऊबीजेच्या शुभेच्छांच्या निमित्ताने अंधारे यांनी मुंडे यांच्या राजकीय पुनरागमनाबाबत अपेक्षा व्यक्त केल्याचे मानले जात आहे. त्यांच्या वक्तव्याला राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply