दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात बाप आणि दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. बेझे धरणात आंघोळीसाठी गेलेल्या वडील आणि त्यांच्या दोन लहान मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, संपूर्ण अंजनेरी गावावर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बेझे धरणाच्या लगत उत्तम चव्हाण यांच्याकडे पाहुणे म्हणून आलेले एकाच कुटुंबातील तीन सदस्य धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेले होते. यादरम्यान, पोहण्यासाठी हे तिघेही धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. सुरेश नामदेव भोर (वय ४२ वर्षे – वडील), ज्योती सुरेश भोर (वय १० वर्षे – मुलगी) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७ वर्षे – मुलगी) अशी मृतांची नावे आहेत. तिघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पोलिसांनी सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेची पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
दिवाळीत आनंद विरघळला
सध्या सणासुदीचे दिवस सुरू असताना आणि दिवाळीची सुट्टी असल्याने मुली आपल्या वडिलांसोबत नाशिकला पाहुण्यांकडे आल्या होत्या. बेझे धरणात पोहण्यासाठी बाप-लेकी गेल्या होत्या. मात्र, कोणालाही कल्पना नव्हती की हा त्यांचा शेवटचा दिवस ठरेल. एकाच कुटुंबातील कर्ता पुरुष आणि दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply