मुलांच्या नाश्त्यासाठी रोज काय बनवावं, असा प्रश्न अनेक पालकांना पडतो. मुलांना नाश्त्यात रोज तेच तेच पदार्थ दिले तर ते कंटाळा करतात. त्यामुळे त्यांच्या आवडीसोबतच आरोग्याचीही काळजी घेणारे वेगवेगळे पदार्थ आहारात असणं गरजेचं आहे. सोयामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने सोया पॅनकेक हा चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता ठरू शकतो. विशेष म्हणजे कमी तेलात आणि कमी वेळेत तयार होणारा हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल.
सोया पॅनकेकसाठी लागणारं साहित्य
१/४ कप सोया चंक्स, २ चमचे तांदळाचं पीठ, ३ चमचे बेसन, १/४ कप दही, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, किसलेला कोबी, कोथिंबीर, २ हिरव्या मिरच्या, २ लसूण पाकळ्या, १/२ इंच आल्याचा तुकडा, २ चमचे तीळ, २ चिमूटभर ओवा आणि चवीनुसार मीठ असं साहित्य लागेल.
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम सोया चंक्स भिजवून फुलवून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात सोया चंक्स, दही, हिरवी मिरची, आलं आणि लसूण घालून चांगलं वाटून घ्या. आता एका भांड्यात बारीक चिरलेल्या आणि किसलेल्या भाज्या घ्या. त्यात सोया चंक्सचं मिश्रण मिक्स करा. त्यानंतर बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, हळद, जिरेपूड, ओवा, गरम मसाला, कोथिंबीर आणि पांढरे तीळ घाला. सर्व चांगलं मिक्स करा. आवश्यक असल्यास थोडं पाणी घालून जाडसर पीठ तयार करा.
आता गॅसवर पॅन गरम करा. ते गरम झाल्यावर तेल घालून तयार केलेलं पॅनकेकचं मिश्रण चमच्यानं घेऊन थोडंसं पसरवा. लहान आकारातील असल्याने एका तव्यावर दोन ते तीन पॅनकेक बनवता येतात. खूप पातळ ठेवू नका. हे मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत शिजवा. हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत गरमागरम सर्व्ह करा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply