सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आडेगाव येथे बिरोबा यात्रेच्या वेळी दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीवर मराठा समर्थकांनी आक्षेप घेतला आणि त्यातून वाद पेटला. सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.
हाके आपल्या समर्थकांसह पोखरापूर येथील बिरोबा यात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर जवळच असलेल्या बिरोबा मंदिरात ते दर्शनासाठी गेले. पूजाऱ्यांच्या आग्रहामुळे त्यांचा सत्कार सुरू असताना मंचावर बोलणाऱ्या आणि समोर बसलेल्या काही जणांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर काही लोक कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून आले आणि ‘तुम्ही इथे कशाला आलात’ असे म्हणत त्यांनी विरोध केला. यावर हाके यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिकार केला आणि त्यातून झटापट झाली.
हाके यांची प्रतिक्रिया
हाके यांनी या घटनेचा निषेध केला. देवाच्या दारात असे घडणे योग्य नाही, असे ते म्हणाले. आम्ही कुठे फिरायचे नाही का, नक्की अडचण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. धमक्यांना घाबरणार नाही, उलट शोषित, वंचित, आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या लढ्याला आणखी तीव्र करू, असे त्यांनी सांगितले. तिथे कोणताही कार्यक्रम नव्हता, भाषण नव्हते, आम्ही केवळ दर्शनासाठी गेलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रसिद्धीसाठी काही लोक पुढे आल्याचा आरोपही त्यांनी केला.
पोलीस बंदोबस्त असतानाही घटना
पोलीस बंदोबस्त असतानाही मंदिराच्या गाभाऱ्यात असा प्रकार घडल्याबद्दल हाके यांनी आश्चर्य व्यक्त केले. दिवाळीनंतर राज्यभरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर देवांच्या यात्रा भरतात. तिथे जात, धर्म, पंथ यांना स्थान नसते आणि देवाच्या दारी सर्वजण समान असतात, असे ते म्हणाले. त्यामुळे हा प्रकार कोणत्या मानसिकतेतून झाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply