गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाचा निकाल लागल्यानंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी शिरगाव येथील गोकुळ चौकात महायुतीकडून आयोजित सभेत सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मतदान सुरू असतानाच व्यासपीठावरून बोलताना पाटील यांना चेव आला आणि त्यांनी सतेज पाटील यांच्यावर तुफान हल्ला चढवला.
पंधरा दिवस केवळ टीका केल्याचा आरोप
चंद्रकांत पाटील म्हणाले की, निकाल लागल्यानंतर बंटी पाटील यांनी पंधरा दिवस केवळ महायुतीला शिव्या दिल्या आणि खोटे कथन पसरवले. एखाद्या लहान मुलाला खेळणे मिळाले नाही की ते हातपाय आपटते, त्रागा करते आणि आईला बोचकारते. त्याचप्रमाणे बंटी पाटील अध्यक्षपद न मिळाल्यामुळे चंद्रकांत पाटील आणि मुश्रीफ यांना बोचकारत आहेत, असे ते म्हणाले. बंटी पाटील हे नावाप्रमाणे बंटीच राहिले, त्यांचे बंटी साहेब कधी झालेच नाहीत, अशा शब्दांत त्यांनी सतेज पाटील यांची खिल्ली उडवली.
लोकशाहीच्या मुद्द्यावरुन प्रतिहल्ला; 2019 चा दाखला
समविचारी आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या सतेज पाटील यांच्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणजे बंटी पाटील. बंटी पाटील यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी कुठे दिसली नाही, असा सवाल त्यांनी केला. बंटी पाटील यांचा स्वभावच असा आहे की, जिथे जातील तिथे सगळ्यांना पायाखाली घ्यायचे, कारण त्यांना केव्हातरी मुख्यमंत्री व्हायचे आहे. मुख्यमंत्री व्हायचे ते ठीक आहे, पण तशी समजही लागते, असे ते म्हणाले. मुन्ना साहेब किंवा धनंजय महाडिक हे राज्यसभा सदस्य आहेत, असे त्यांनी सांगितले. बंटी पाटील विरोधक आहेत, तरीही त्यांना अरे बंटी, काय म्हणता असे म्हणतो, पण या पंधरा दिवसांत हेच लक्षात आले की ते बंटीच आहेत, बंटीचे बंटीसाहेब कधी झालेच नाहीत, असे पाटील म्हणाले.
बंटी पाटील गोकुळच्या निवडणुकीत लोकशाहीची तत्त्वे पायदळी तुडवण्यात आल्याचे म्हणतात. पण या निवडणुकीत त्यांचे 13 संचालक निवडून आले आणि त्यांना 4900 मते मिळाली. महायुतीचे 12 संचालक निवडून आले आणि आम्हाला 5100 मते मिळाली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तुम्ही ज्या पक्षाचे आहात, त्याच्या पूर्वजांपर्यंत गेल्यास तुम्ही लोकशाही कशी पायदळी तुडवली आहे हे समजून येईल, असा सवाल त्यांनी केला. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांनी लिहिण्यावर, बोलण्यावर आणि छापण्यावर बंदी घातली आणि 20 लाख लोकांना तुरुंगात टाकले, असा दावा त्यांनी केला. आज त्याच पक्षाचे बंटी पाटील आम्हाला लोकशाही शिकवणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीचा दाखला देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, त्यावेळी महायुतीचे 161 अधिक 5 पक्ष असे एकूण 166 आमदार निवडून आले होते. बहुमतासाठी 144 आमदार लागतात. त्यावेळी बंटी पाटील नेतृत्व करत होते आणि शरद पवार यांच्या मदतीने जयपूरमध्ये जाऊन लपून बसले, असा आरोप त्यांनी केला. सोनिया गांधी यांना धमकावण्यात आले की, शिवसेना आणि शरद पवार यांच्यासोबत सरकार बनवले नाही तर 40 जणांचा गट फोडून सरकारमध्ये सहभागी होऊ, असा दावा पाटील यांनी केला. शिवसेना पूर्णपणे तोडून जनादेश पायदळी तुडवण्यात आला, असे ते म्हणाले. वेळ पडली तर सर्व कॉल रेकॉर्ड देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉलचा उल्लेख करताना ते म्हणाले की, सोनिया गांधी यांच्या कोल्हापुरातील अत्यंत जवळच्या मित्राने सतेज पाटील यांना समोरासमोर फोन करून स्पीकरवर ठेवले होते. त्यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, तो कोल्हापूरचा तुमचा बंटी आहे आणि तो मला धमकावत आहे, असा दावा पाटील यांनी केला. तुम्ही करता ते योग्य आणि मुश्रीफ साहेब करतील ते अयोग्य, हे आता चालणार नाही. आम्ही कोणाला टोकणार नाही, पण कोणी टोकले तर सोडणार नाही, असे ते म्हणाले. आपली वैचारिक उंची पाहून काम करा, आमच्यावर बोलू नका, असे आवाहन त्यांनी केले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत, असे ते म्हणाले. तुमची इतकी मालमत्ता कुठून आली, असा सवाल करत त्यांनी आरोप केला की, बंटी पाटील यांना मलई खाण्यासाठी गोकुळची सत्ता हवी आहे आणि कुटुंबात इतरांपेक्षा श्रीमंत होण्याचे व मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न त्यांना पडले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply