कल्याण पश्चिमेतील मोहणे परिसरात एक अत्यंत संवेदनशील घटना समोर आली आहे. साठ वर्षीय वसीमुन निसा काझी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी कुटुंबीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने तब्बल आठ तास मृतदेह प्रतीक्षेत ठेवावा लागला, त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दोन कब्रस्तानांत नकार मिळाल्याचा आरोप
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सर्वप्रथम उल्हासनगर येथील कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी नकार देण्यात आला. त्यानंतर नातेवाईकांनी कल्याण पश्चिमेतील टेकडी कब्रस्तान येथे दफनविधीची प्रक्रिया करण्यासाठी धाव घेतली. मात्र, तेथेही दफन करण्यास नकार मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
आयुक्तांच्या बंगल्याकडे अंत्ययात्रा
गेल्या आठ तासांपासून दफनविधीसाठी जागा मिळत नसल्याने हतबल झालेल्या कुटुंबीयांनी अखेर मृतदेह थेट कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या बंगल्यासमोर नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी प्रेम ऑटो परिसरात अंत्ययात्रेसह नातेवाईकांना अडवले. त्यानंतर नातेवाईकांनी कल्याण नगर महामार्गावर मृतदेह थांबवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले.
तोडगा निघेना, चर्चा सुरू
रात्री सात वाजेपर्यंतही अंत्यविधीचा मार्ग मोकळा झाला नव्हता. दीड तासांपासून रस्त्यावरच अंत्ययात्रा उभी असल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू असून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. मृत्यूनंतरच्या अंत्यविधीसाठी जागा मिळत नसल्याने रस्ता रोको करण्याची वेळ पीडित कुटुंबीयांवर आल्याने नागरिकांमधूनही चीड व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply