करोना विषाणू आणि त्याच्या संसर्गाचा कहर जगानं २०२० मध्ये अनुभवला. करोनामुळे लाखो लोकांनी जीव गमावला आणि संपूर्ण जगानं लॉकडाऊन पाहिला. या कटू आठवणी आजही ताज्या असताना कोविडचा नवा व्हेरिएंट PJ.2.1 चर्चेत आला आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं महत्त्वाचा इशारा दिला आहे. केवळ लक्षणांच्या आधारे संसर्ग नेमका कोविडचा आहे की फ्लूचा आहे की अन्य विषाणूचा आहे, हे सांगणं अवघड असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. त्यामुळे गरज भासल्यास तपासणी करणं आवश्यक ठरू शकतं.
PJ.2.1 म्हणजे नेमकं काय?
PJ.2.1 हा कोविड विषाणूचा एक नवा स्ट्रेन आहे. मे महिन्यात कॅनडात या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला. याच वर्षी जूनमध्ये अमेरिकेत या स्ट्रेनचे रुग्ण सापडले होते. आता अमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इस्रायल, फ्रान्स, स्पेन आणि जगाच्या इतर भागांमध्येही या व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. जगातील आठ प्रमुख देशांमध्ये नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याची माहिती आहे.
लक्षणं कोणती?
PJ.2.1 ची लागण झाल्यावर घशात तीव्र वेदना होतात आणि संसर्ग संपुष्टात आल्यावरही थकवा दीर्घकाळ राहतो. रशियाच्या संसर्गरोग तज्ज्ञ आणि विषाणूतज्ज्ञ एलेना मालिनिकोवा यांनी या लक्षणांचा उल्लेख केला आहे. ताप, घशात खवखव, खोकला, सर्दी, नाक बंद होणं, डोकेदुखी आणि अंगदुखी ही या व्हेरिएंटची लक्षणं आहेत. कोविडच्या जुन्या व्हेरिएंटमध्ये काही लक्षणं सामान्य फ्लूपेक्षा वेगळी होती. पण आता घशात खवखव, खोकला, सर्दी आणि अनेक दिवस राहणारा थकवा कोविड आहे की सामान्य फ्लू, हे ओळखणं चाचणी केल्याशिवाय अवघड असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.
कोणाला अधिक धोका?
हा व्हेरिएंट धोकादायक नसून याची बहुतांश लक्षणं फ्लूसारखीच असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. मात्र वृद्ध, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती आणि आधीपासूनच गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या रुग्णांना या व्हेरिएंटचा अधिक धोका आहे. अशांनी श्वासाशी संबंधित संसर्गांकडे दुर्लक्ष करू नये. ताप, सततचा खोकला आणि घशात वेदना होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply