बुधवार, ११ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मुंबईत झेब्रा क्रॉसिंगअभावी पादचाऱ्यांचे हाल

मुंबईत अनेक ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नसल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागते. भांडुप आणि मानखुर्द येथे ही समस्या सर्वाधिक गंभीर आहे.

मुंबईत झेब्रा क्रॉसिंगअभावी पादचाऱ्यांचे हाल

मुंबईत अनेक ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग नसल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून जावे लागते. यात सर्वाधिक हाल ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि शालेय विद्यार्थ्यांचे होतात. ही समस्या शहरात अनेक ठिकाणी असली, तरी भांडुप येथील सोनापूर उड्डाणपुलाखाली आणि मानखुर्द शीव-पनवेल मार्गावर ती सर्वाधिक गंभीर आहे. या दोन्ही ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांची वर्दळ चोवीस तास असते.

## झेब्रा क्रॉसिंगचा अभाव

शहरातील अनेक चौकांत झेब्रा क्रॉसिंग एकतर नाही किंवा अत्यंत फिकट झालेले आहेत. ते ना वाहनचालकांच्या लक्षात येतात, ना पादचाऱ्यांना दिसतात. शीव-पनवेल महामार्ग देशातील सर्वात व्यस्त महामार्गांपैकी एक आहे. तरीही या ठिकाणी मानखुर्द महाराष्ट्र नगर बस थांब्याजवळील उड्डाणपुलाखाली झेब्रा क्रॉसिंग नाही. घाटकोपर उड्डाणपुलावरून सुसाट गाड्या उतरून मुंबई किंवा नवी मुंबईच्या दिशेने निघून जातात. तर मुंबईकडून पनवेल किंवा घाटकोपर मार्गावर गाड्यांचा वेगही सुसाट असतो.

रस्ते बांधकामामुळे धीमी गतीतील वाहतूक या ठिकाणी मोकळा रस्ता असल्याने सुसाट होते. या ठिकाणी सिग्नल असले तरी, एकामागे एक सिग्नल सुटण्यापूर्वी गाड्या दामटल्या जात असल्याने रस्ता ओलांडण्यास संधी मिळत नाही.

## भांडुपमध्येही तीच समस्या

असाच प्रकार भांडुप येथील सोनापूर बस थांब्याजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली आहे. येथे मेट्रो उड्डाणपुलाचेही काम सुरू आहे. त्यामुळे जड अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होते. नवी मुंबई, ठाणे, अंधेरी, मुलुंड, मरोळ, मजास या ठिकाणच्या गाड्यांचे मार्ग या चौकातून विभागले जातात. त्यामुळे प्रचंड वाहतूक होते. मात्र झेब्रा क्रॉस पट्टे नसल्याने येथेही नागरिकांची तारांबळ उडते.

## रात्रीच्या वेळी अधिक धोका

येथे दररोज अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यात दोन्हीकडील वाहतूक पोलीस रात्रीच्या वेळी अनेकदा नसतात. अशा वेळी वाहने प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत असल्याने रात्री-अपरात्री पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे जीवाची परीक्षा वाटते, अशी खंत भांडुप येथे राहणाऱ्या माधव नेने या ज्येष्ठ नागरिकाने व्यक्त केली.

या दोन्ही ठिकाणच्या वाहतूक पोलिसांशी चर्चा केली असता, त्यांनी ही गंभीर समस्या असल्याचे मान्य केले. मात्र या प्रकरणी झेब्रा क्रॉस पट्टे मारावेत, अशी विनंती दोन्हीकडील मुंबई महानगरपालिका विभाग कार्यालयांना अनेकदा केली. पत्रे आणि स्मरणपत्रे देऊनही अद्याप झेब्रा क्रॉस पट्टे मारलेले नाहीत, अशी खंत पोलिसांनी व्यक्त केली. या बाबत संबंधित विभाग कार्यालयाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance