राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा त्यावेळी झाली होती आणि त्यासाठी आम्हीच पुढाकार घेतला होता. मात्र समोरून काही प्रस्ताव आला नाही, म्हणून आम्ही थांबलो, असे शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले आहे.
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची तब्येत विचारण्यासाठी नेते भेटायला येत आहेत. पार्थ पवार आणि रोहित पवार यांनीही पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. बैठका घेण्याचे आधीच ठरले होते आणि दोन दिवसांनी नेते पुन्हा भेटणार आहेत. रोहित पवार उद्या एक दिवस दिवाळीसाठी घरी जाणार आहेत. मात्र या भेटींमध्ये विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. प्रफुल पटेल यांना दहा तारखेनंतर भेटायला या, असा निरोप दिला होता. त्यामुळे ते भेटायला येत आहेत, असेही शिंदे म्हणाले. कोणाच्या डोक्यात आता काय चालले आहे, हे कसे कळणार, कारण राजकारणात असे जर-तरला काही अर्थ नसतो, असेही त्यांनी नमूद केले.
रामदास कदम यांच्या दाव्यावर शिंदे काय म्हणाले
शिवसेना नेते रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात काही धक्कादायक दावे केले आहेत. यावर बोलताना शिंदे म्हणाले की, रामदास कदम यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सीबीआयकडे सुपूर्द करावेत. सीबीआयकडून आम्हाला तपासाची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.
गोकुळ दूध महासंघ निवडणुकीवरून सरकारवर टीका
गोकुळ दूध महासंघाच्या निवडणूक प्रकरणात आज मोठा मोर्चा निघाला होता. मात्र न्यायालयाने आदेश दिला तर त्याप्रमाणे कारवाई होणार आहे. सरकारने ज्या प्रकारे निर्णय घेतला आहे, त्यातून सरकारला अधिपत्य गाजवायचे आहे हेच दिसून येते, असे शिंदे म्हणाले. फक्त निवडणूक आहे म्हणून चार स्वीकृत सदस्यांना अधिकार देणे योग्य नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply