जळगावमध्ये वातावरणातील बदल, वाढलेला गारवा आणि दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यातच फटाक्यांच्या धुरामुळे घशात खवखव, खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. दुसरीकडे, दिवाळीच्या फराळातील शेव, चिवडा आणि इतर तेलकट पदार्थांच्या सेवनामुळेही त्रास जाणवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. दिवसा आणि रात्रीच्या तापमानातील फरकामुळे सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. तर मागील दोन दिवसांपासून सकाळी आणि रात्री जाणवणारा गारवा वाढला आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. प्रामुख्याने लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिक त्रास जाणवू लागला आहे. अनेकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी असून रुग्णालयातही रुग्णांची संख्या वाढली आहे.
फटाक्यांच्या धुराचाही त्रास
दिवाळीत मोठ्या प्रमाणावर फटाके फोडण्यात आल्याने परिसरात धूर आणि धुळीचे प्रमाण वाढले होते. या धुरामुळे घशात खवखव, कोरडा खोकला, डोळ्यांची जळजळ तसेच श्वास घेण्यास त्रास जाणविल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आधीच सर्दी-खोकल्याचा त्रास असलेल्या नागरिकांना धुरामुळे अधिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे.
तेलकट खाण्याचा त्रास
दरम्यान मागील आठ दिवसांपासून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरांत फराळ तयार केला गेला आहे. शेव, चिवडा, चकली, करंजी आणि लाडू अशा पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. तेलकट, मसालेदार पदार्थांचे अतिसेवन आणि अनियमित आहारामुळे काही नागरिकांना अपचन, आम्लपित्तासारख्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.
बदलत्या हवामानात नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, स्वच्छ आणि ताजे अन्न खाणे, धुराच्या संपर्कापासून शक्यतो दूर राहणे तसेच थंडीपासून बचाव करणे आवश्यक आहे. मागील तीन-चार दिवसांपासून थंडी वाढल्याने वातावरणातील या बदलाचा परिणाम अनेकांना जाणवत आहे. यातच दिवाळीचा फराळ खाण्यात येत असल्याने सर्दी, खोकला, ताप व घसा खवखवण्याचा त्रास वाढला आहे, असे चामुंडाई क्लिनिक, जळगाव येथील डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply