महानगर गॅस कंपनीच्या नावाने पाठवलेल्या पत्राचा वापर करून सायबर चोरट्यांनी ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची सहा लाख ५८ हजार २९६ रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. गॅस ग्राहक म्हणून नोंद असलेल्या नावात बदल करण्यासाठी केवळ १३ रुपये शुल्क आकारले जाणार असल्याचे सांगून बनावट लिंक पाठवण्यात आली आणि त्या लिंकद्वारे बँक खात्यांतील रक्कम काढून घेण्यात आली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बनावट लिंक पाठवून खात्यातील रक्कम काढली
पोखरण रोड क्रमांक १ परिसरात राहणाऱ्या रत्नाकर बट्टापाडी (७७) यांना २५ ऑक्टोबरला महानगर गॅस कंपनीच्या नावाने पत्र मिळाले होते. त्यात मोबाईल क्रमांक आणि ई-मेल अद्ययावत करण्याबाबत सूचना होत्या. पत्रावरील क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर १ नोव्हेंबरला एका व्यक्तीने महानगर गॅस कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून त्यांना लिंक पाठवली. नावात बदल करण्यासाठी १३ रुपये भरण्यास सांगण्यात आले.
बट्टापाडी यांनी लिंक उघडून प्रथम कॅनरा बँक आणि त्यानंतर कर्नाटक बँकेच्या डेबिट कार्डची माहिती भरली. मात्र, व्यवहार पूर्ण न झाल्याचे भासवण्यात आले. त्यांनी ओटीपी कोणालाही न सांगता फोन बंद केला. तरीही दुसऱ्याच दिवशी त्यांच्या दोन्ही खात्यांतून अनुक्रमे सहा लाख ३४ हजार ५०८ रुपये आणि २३ हजार ७८८ रुपये असे एकूण सहा लाख ५८ हजार २९६ रुपये काढल्याचे संदेश आले.
दोन अनोळखी क्रमांकांविरोधात तक्रार
त्यानंतर त्यांनी सायबर तक्रार नोंदवली असून, दोन अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून संपर्क साधणाऱ्यांविरोधात तक्रार दिली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply