जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी काळात पशुधनासाठी चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसातील तूट आणि रब्बीच्या पेरणी क्षेत्रात संभाव्य घट लक्षात घेऊन ही टंचाई रोखण्यासाठी प्रशासनाने रोजगार हमी योजनेतून चारा पिकांच्या लागवडीवर भर दिला आहे.
सात सुधारित चारा पिकांचा समावेश
गायरान जमिनींसह पात्र शेतकऱ्यांच्या वैयक्तिक शेतजमिनीवर मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत यांसह सात प्रकारच्या सुधारित चारा पिकांची लागवड करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. या योजनेतून चारा उत्पादनाबरोबरच ग्रामीण भागातील मजुरांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) योजनेंतर्गत चारा लागवडीची कामे मंजूर करण्यात येणार आहेत.
यामध्ये मका, ज्वारी, बाजरी, नेपियर गवत, मेथी घास, ज्वारी मल्टीकट आणि बाजरी मल्टीकट या सात चारा पिकांचा समावेश आहे. या पिकांच्या लागवडीसाठी हेक्टरी ३५ हजार ५०५ रुपयांपासून ते एक लाख १३ हजार २९० रुपयांपर्यंत आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यातून पिकनिहाय ७४ ते २७० मनुष्यदिवस रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मजुरांच्या श्रमांना प्राधान्य
चारा पिकांच्या लागवडीसाठी सुधारित वाणांचे बियाणे अधिकृत संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कामांमध्ये मजुरांच्या श्रमांना प्राधान्य दिले जाणार असून, मजुरांमार्फत करता येणाऱ्या कामांसाठी यंत्रसामग्रीचा वापर करता येणार नाही. पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.
संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी शेतकरी आणि ग्रामपंचायतींनी आतापासूनच पुढाकार घेऊन चारा पिकांची लागवड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply