लाडसावंगी, जि. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या २६९ व्या द्वादश मेळाव्यात फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे यांनी दुष्काळी परिस्थितीत फळबागा कशा वाचवाव्यात, याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी सर्वप्रथम आपल्याकडील पाणी नक्की किती आहे, याचा हिशेब करून फळबागा वाचवण्याचे नियोजन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. पाणी कमी असेल तर मोसंबी बागायतदारांनी आंबिया बहार घेणे टाळावे. डाळिंब आणि आंबा बागायतदारांनीही कुठल्याही प्रकारची फळधारणा घेण्याचा अट्टाहास करू नये, असे त्यांनी सांगितले.
बागा वाचवण्यासाठी उपाय
डॉ. कापसे यांनी सांगितले की, आंब्याला मोहर येताच तो लगेच काढून टाकू नये; थोडा सेटिंग होईपर्यंत थांबून नंतर काढून टाकावा. झाडावर नवीन पालवी आल्यास ती काढून टाकावी आणि झाडाच्या पानांची थोडीफार फांद्या कापून विरळणी करावी. झाडावर पानाद्वारे होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी पाच ते सहा टक्के केओलीन या बाष्पीभवन रोधकाची फवारणी करावी. पान आणि देठाचे परीक्षण करून झाडामध्ये जमिनीतून किंवा फवारणीद्वारे पोटॅश द्यावा, जेणेकरून त्याची कमतरता राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
कापूस उत्पादकांनाही मार्गदर्शन
कापूस तज्ज्ञ डॉ. एस. एस. माने यांनी आता काढणीस सुरुवात झालेल्या कापसामध्ये सेंद्रिय बोंड अळी तसेच इतर माध्यमातून काळजी घ्यावी आणि आपली उत्पादकता शक्यतो वाढवावी, याविषयी शास्त्रीय मार्गदर्शन केले. लाडसावंगी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, ऍग्रो इंडिया गट शेती संघ आणि सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ, संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या वेळी बाबासाहेब नारायण पडुळ, विठ्ठल भोसले, रमेश शिंदे, सुदाम पवार, संस्था चेअरमन विजय काळे, सचिव विजय दाभाडे आणि आप्पा बोचरे यांच्यासह परिसरातील फळ बागायतदार व शेतकरी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply