राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरून राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांनी या विषयावर महत्त्वाचे विधान केले आहे. दोन्ही गटांकडून विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नसल्याचे सांगितले जात असले, तरी युगेंद्र पवार यांनी वेगळीच माहिती दिली आहे.
अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर दोन्ही गटांतील नेत्यांच्या बैठका झाल्या आणि त्यामुळे विलिनीकरणाबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
विलिनीकरण ठरलेले होते, १२ फेब्रुवारीला घोषणा होणार होती
युगेंद्र पवार म्हणाले की, विलिनीकरण होणारच होते. ही चर्चा आजची नाही, तर अनेक महिन्यांपासून याबाबत चर्चा आणि बातम्या येत होत्या. अजित पवार यांची याबाबत बैठक झाली होती. गोविंदबागेतही त्यांची बैठक झाली होती आणि त्यावेळी पत्रकारही उपस्थित होते.
सर्व काही ठरलेले होते आणि साधारण १२ फेब्रुवारीला अजित पवार स्वतः याची घोषणा करणार होते. मात्र अचानक अजित पवार यांचे निधन झाले आणि त्यामुळे हा विषय मागे पडला. विलिनीकरण होणे ही अजित पवार यांची इच्छा होती आणि शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकदा एकत्र यायचे होते, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
विमान अपघाताची चौकशी व्हावी
यावेळी बोलताना युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबतही महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, आपण विमान क्षेत्रातील तज्ज्ञ नाही, पायलटही नाही आणि त्याचा अभ्यासही केलेला नाही. तरीही चौकशी झालीच पाहिजे, ही सर्वांची भूमिका आहे.
अजित पवार यांचे निधन झाले त्यावेळी आपण बारामती पोलीस ठाण्यात बसलो होतो, असे युगेंद्र पवार म्हणाले. रोहित पवार हेदेखील अनेक दिवसांपासून या विषयावर बोलत आहेत. चौकशी लवकर व्हावी आणि अहवाल सर्वांसमोर जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
युगेंद्र पवार यांनी गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावरही आपली भूमिका मांडली. कोल्हापूरच्या जनतेने बंटी पाटील यांच्या बाजूने निकाल दिला आहे, असे ते म्हणाले. तिथे नवे संचालक नेमणे किंवा तसा निर्णय घेणे चुकीचे असून लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळेच कोल्हापूरची जनता बंटी पाटील यांच्यासाठी रस्त्यावर उतरली आहे, असे त्यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply