भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत कार्यरत माय भारत केंद्रातर्फे नंदुरबारच्या एम. के. डी. कॉलेज ऑफ फार्मसी येथे ‘विकसित भारत युवा संवाद – आपले मत जाणून घ्या’ कार्यक्रम झाला. युवकांमध्ये लोकशाही मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे आणि लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
मतदानाचे महत्त्व पटवून दिले
‘माय भारत’ केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी प्रास्ताविकातून माय भारतच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी डॉ. संतोष महाजन, डॉ. ओम सुगंधी, डॉ. अधिकार बोरसे, यशवंत हिरे आणि पवन नाईक उपस्थित होते. कार्यक्रमात लोकशाही शपथ घेण्यात आली. युवा आयकॉन कमलेश सोनवणे यांनी मतदानाचे महत्त्व, मतदारांचे अधिकार व कर्तव्ये, तसेच लोकशाही प्रक्रियेतील युवकांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. युवा संवाद सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपले विचार मांडले.
पोर्टलवर नोंदणीचे आवाहन
या वेळी युवकांना माय भारत पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून सूचना व अभिप्राय नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आपले मत हाच आपला आवाज असून जागरूकतेने दिलेले मत देशाच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरवू शकते, असे माय भारत केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी भूषण पाटील यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply