साक्री तालुक्यातील बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी पंचायत समितीच्या आवारात हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या केंद्राचे लोकार्पण आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या संधीचा सर्व बचत गटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामीण भागातील महिलांनी स्वयं-सहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने पंचायत समिती साक्रीच्या आवारात हे मार्केट आऊटलेट उभारण्यात आले आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयं-सहाय्यता समूहांनी तयार केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी हे स्वतंत्र विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे साक्री तालुक्यातील बचत गटांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
दर्जेदार उत्पादनाचे आवाहन
बचत गटांनी रोटेशन पद्धतीने आपली उत्पादने विक्रीसाठी आणावीत आणि ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वस्तूंचे उत्पादन करावे, असे आवाहन आमदार मंजुळा गावित यांनी केले. या वेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनवणे, उमेद अभियानाचे संतोष पगारे, विस्तार अधिकारी खाडे, संदीप बोरसे, सहायक गटविकास अधिकारी खेमकर, गटशिक्षणाधिकारी कविता मेखे यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी आणि बचत गटांच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला बळ
या मार्केट आऊटलेटमुळे ग्रामीण महिलांनी मेहनतीने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळणार असून, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढण्यास मदत होणार आहे. परिणामी, महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणाला आणि स्वावलंबनाला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply