अनेक वर्षांपासून बंद असलेल्या लातूर विमानतळाच्या विकासकामांना आता गती मिळणार आहे. विमानतळाच्या विकासासाठी राज्य सरकारने यापूर्वी ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर आता संरक्षण भिंत आणि अन्य विकासकामांसाठी आणखी ४.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
विकासकामांच्या नियोजनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सल्लागार नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ऐन दिवाळीच्या काळात सरकारकडून लातूरकरांना ही मोठी भेट मिळाली आहे.
५७ कोटीनंतर आणखी ४.१५ कोटींचा निधी
उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील विविध विमानतळांवरील अपुऱ्या सुविधांचा प्रश्न चर्चेत आला होता. लातूर विमानतळावरही आवश्यक तांत्रिक व भौतिक सुविधा नसल्याकडे वृत्तमालिकेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते. त्याची दखल लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी घेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली होती.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे लातूर विमानतळावर सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एक जूनला ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर आता संरक्षण भिंत व अन्य विकासकामांसाठी ४.१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सोळा वर्षांपासून बंद विमानतळ
लातूर विमानतळावरून २००८ मध्ये पहिले विमान उडाले होते. त्यानंतर २००९ मध्ये हे विमानतळ एका खासगी कंपनीला चालवण्यासाठी देण्यात आले. मात्र, वर्षभरातच तेथील विमानसेवा बंद झाली. त्यामुळे गेली सोळा वर्षे हे विमानतळ बंद अवस्थेत आहे.
सुरुवातीला सरकारने हे विमानतळ ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर खासगी कंपनीला दिले होते. मात्र, अटी-शर्तींचा भंग झाल्याने विमानतळ कंपनीकडून काढून घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या. त्यानंतर एमआयडीसीने विमानतळ ताब्यात घेतले आणि वर्षभरापूर्वी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे ते सोपवण्यात आले.
निधी उपलब्ध झाल्यानंतर कंपनीकडून वेगवेगळी विकासकामे हाती घेतली जात आहेत. सल्लागार नियुक्ती हे त्यातील पहिले पाऊल असून, याबाबतची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी समाजमाध्यमातून दिली आहे. दरम्यान, कंपनीचे अधिकारी विमानतळाला भेटी देऊन विकासकामांची माहिती घेत आहेत. त्यामुळे येथून लवकरच विमानांचे उड्डाण होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.
विमानतळाची एकूण जागा ४८ हेक्टर असून, धावपट्टीची लांबी १७०० ते २००० मीटर आणि उंची ६४९ ते ६९४ मीटर आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply