सोशल मीडियावर बिट्टू तबाही नावाने प्रसिद्ध असलेल्या २१ वर्षीय तरुणाने अजनार नदी साफ करण्याचा विडा उचलला होता. त्याच्या मेहनतीमुळे नदीला नवे जीवन मिळाले होते. मात्र लोकांनी पुन्हा नदीत कचरा टाकायला सुरुवात केली आणि बिट्टू पुन्हा पाण्यात उतरला. या प्रदूषित नदीच्या स्वच्छतेची मोठी किंमत त्याला मोजावी लागत आहे. त्याची त्वचा खराब झाली असून त्याच्या प्रकृतीबद्दल नेटकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
एकट्याने सुरू केलेले नदी स्वच्छतेचे काम
मध्य प्रदेशातील ब्यावरा येथील बिट्टूने २६ जानेवारी २०२६ पासून अजनार नदी स्वच्छ करण्यास सुरुवात केली. नदीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या आणि शेवाळ साचला होता. हा सगळा कचरा बाहेर काढण्यासाठी त्याने स्वतःहून काम सुरू केले. सुरुवातीला त्याच्याकडे विशेष यंत्रसामग्री किंवा मोठी टीम नव्हती. हातमोजे, बूट, काठी आणि साधनांच्या मदतीने तो नदी स्वच्छ करत होता. काही वेळा तर त्याने हातानेच कचरा बाहेर काढला आहे.
त्वचेचा त्रास, तरीही काम सुरूच
प्रदूषित पाणी आणि कुजलेल्या कचऱ्याच्या सतत संपर्कात राहण्यामुळे बिट्टूच्या हातापायांची त्वचा निघून गेल्याचे त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत दिसत आहे. त्वचेवर संसर्गासारखी लक्षणे दिसत असून त्याला सतत खाज आणि वेदनांचा त्रास होत आहे. हा त्रास इतका वाढला आहे की त्याला औषधे सुरू करावी लागली आहेत. त्याच्या आई-वडिलांनाही त्याच्या प्रकृतीची चिंता वाटू लागली आहे. एवढा त्रास होत असतानाही बिट्टूने नदी स्वच्छ करण्याचे काम सोडलेले नाही. नदीत पुन्हा कचरा टाकला जात असल्याने त्याची मेहनत वाया जात असल्याची खंतही त्याने व्यक्त केली आहे.
बिट्टूचा हा व्हिडिओ पाहून नेटकरीही चिंतेत पडले आहेत. अनेकांनी त्याला आधी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे. प्रदूषित पाण्यात उतरताना योग्य सुरक्षा साधने वापरणे गरजेचे आहे, असेही अनेकांनी म्हटले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply