सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दिवाळीतही ऊसतोड मजुरांचे काम सुरूच, फडातच साजरी दिवाळी

दिवाळीतही ऊसतोड मजुरांचे काम सुरूच आहे. गावांत फटाक्यांची आतषबाजी असताना उसाच्या फडात कोयत्यांचा आवाज घुमत आहे; मजुरांची दिवाळी भाकर-तुकड्यावर साजरी होत आहे.

दिवाळीतही ऊसतोड मजुरांचे काम सुरूच, फडातच साजरी दिवाळी

गावागावांत रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना उसाच्या फडात मात्र कोयत्यांचा आवाज घुमत आहे. दिवाळी सण मोठा असला तरी पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैल भटकंती करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या आयुष्यात या सणाचा आनंद फारसा उरलेला नाही. जळकोट परिसरात ऊसतोड मजुरांची दिवाळी यंदाही उसाच्या फडातच भाकर-तुकड्यावर साजरी होत आहे.

वर्षभराच्या उदरनिर्वाहासाठी हे मजूर ऊस गळीत हंगामातील कमाईवर अवलंबून असतात. दुष्काळी भागांतून स्थलांतरित झालेले मजूर कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता पहाटेच पत्नी व लहान मुलांसह फडात दाखल होतात. दिवसभर काबाडकष्ट करून चटणी-भाकरीवर भूक भागवून सायंकाळी उशिरा तात्पुरत्या उभारलेल्या पालांकडे परततात.

कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू

ऊसदर आंदोलनानंतर बहुतांश साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यामुळे अनेक भागांतून आलेल्या ऊसतोड टोळ्यांची फडात लगबग वाढली आहे. स्थानिक टोळ्या साधारणपणे दिवाळीनंतर कामाला सुरुवात करतात. मात्र, यंदा ऐन दिवाळीच्या तोंडावर ऊसदराचा तोडगा निघाल्याने कारखाने सुरू झाले आणि परराज्यांतील टोळ्यांना कामावर राहावे लागले.

गावी परतल्यावरच सण

मुकादम, वाहनमालक आणि कंत्राटदारांकडून घेतलेली उचल याच साडेतीन-चार महिन्यांच्या हंगामात फेडण्याचे मोठे बंधन या मजुरांवर असते. हंगामातील मोजक्या महिन्यांत जास्तीत-जास्त ऊस तोडला, तरच चार पैसे हातात पडतात. त्यातून घेतलेली उचल फिटून पुढील पावसाळ्यातील संसाराचा गाडा हाकण्यासाठी काही रक्कम शिल्लक राहते. त्यामुळे लहान मुलांना सोबत घेऊन फडात राबण्याशिवाय गत्यंतर उरत नाही. गावी परतल्यानंतरच काय तो सण, अशी व्यथा हे मजूर बोलून दाखवितात.

या मजुरांचीही दिवाळी गोड व्हावी, यासाठी एका टोळी मुकादमाकडून दरवर्षी तयार फराळ, फटाके आणि कपडेलत्ते देऊन सहकार्य केले जाते.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance