कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, म्हणजेच गोकुळच्या निवडणुकीनंतर उफाळलेल्या वादाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून शासन नियुक्त संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार दिल्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दसरा चौकातून संघर्ष मोर्चा काढण्यात आला.
निवडणुकीत नेमके काय घडले
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या आघाडीने एकूण २५ पैकी १३ जागांवर विजय मिळवला होता. मात्र अध्यक्षपदाच्या निवडीची वेळ आली तेव्हा महायुतीच्या संचालकांनी सभेला गैरहजेरी लावली. त्यानंतर शासनाने चार संचालकांची नियुक्ती केली. या निर्णयाला सतेज पाटील यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. एकीकडे कोल्हापुरात जनआक्रोश सुरू असताना दुसरीकडे औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली आहे.
मोर्च्यातील प्रतीकात्मक आंदोलन
हा मोर्चा दसरा चौकातील राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाला. गोकुळ वाचवा, लोकशाही टिकवा अशा आशयाचे फलक मोर्चेकऱ्यांनी हाती घेतले होते. दहा फुटी कोल्हापुरी पायताण, बैलगाडीतून यमराजाच्या वेशभूषेत आलेला कार्यकर्ता आणि बळीराजाची प्रतिकृती यांसारख्या प्रतीकात्मक आंदोलनांनी मोर्च्यात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कोल्हापूरचे वकीलही संविधानाच्या संरक्षणासाठी या मोर्च्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply