अभिनेत्री दिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून दिवाळीनिमित्त केलेल्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. फटाके न फोडता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केल्याने तिला सोशल मीडियावर मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. तिच्या धार्मिक ओळखीवरूनही काही जणांनी आक्षेप घेतला होता. या वादानंतर आता तिने विधीवत लक्ष्मीपूजन केले असून, या पूजेचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रदूषणमुक्त दिवाळीच्या आवाहनावरून वाद का झाला?
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत दिया मिर्झासह माधुरी दीक्षित आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांचाही सहभाग होता. दिया मिर्झाने व्हिडीओच्या माध्यमातून नागरिकांना फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र या व्हिडीओवरून वाद निर्माण झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी तिच्या मोहिमेतील सहभागावर आक्षेप घेतला. त्यानंतर मुंबई महापालिकेने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावरून हटवला. या प्रकरणामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातही चर्चा रंगली होती. यावर प्रतिक्रिया देताना दिया मिर्झाने आपण या मोहिमेसाठी कोणतेही पैसे घेतले नसल्याचे स्पष्ट केले होते. पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हा व्हिडीओ केल्याचेही तिने सांगितले होते.
लक्ष्मीपूजनाच्या फोटोंवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
या संपूर्ण वादानंतर आता दियाने दिवाळी साजरी करण्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या दिवाळी उत्सवाची सुंदर झलक पाहायला मिळते. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करत तिने लक्ष्मीपूजन केल्याचेही या पोस्टमधून दिसत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. कोणत्याही धर्माची असली तरी प्रत्येक सण साजरा करण्याचा अधिकार तिला आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी तिला धर्माच्या ठेकेदारांकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला दिला आहे. काहींनी तिच्या विचारांचे समर्थन करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे चुकीचे नसल्याचे म्हटले आहे. दिवाळी साजरी करण्याचा आनंद आणि पर्यावरणाची काळजी या दोन्ही गोष्टी एकत्र असू शकतात, अशी चर्चा तिच्या पोस्टमुळे पुन्हा सुरू झाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply