मुंबईतील पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. विरार ते नालासोपारा स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या रात्री वाजवलेल्या फटाक्यांमुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
रॉकेट सिग्नल बॉक्समध्ये शिरल्याने आग, वायरिंग जळाले
मिळालेल्या माहितीनुसार, फटाक्याची रॉकेट सिग्नल बॉक्समध्ये शिरल्याने त्यात आग लागली आणि सिग्नल वायरिंग जळून खाक झाली. त्यामुळे विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सेवा जवळपास पंधरा ते तीस मिनिटे उशिराने धावत आहेत. पश्चिम रेल्वे प्रशासनाने या सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. रेल्वे प्रशासनाकडून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सुट्ट्यांमुळे गर्दी कमी, पण चाकरमान्यांना फटका
सध्या दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर नेहमीसारखी गर्दी नसली तरी, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र या विलंबाचा मोठा फटका बसला आहे. सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना लोकलच्या विलंबामुळे अडचणींना सामोरे जावे लागले. सिग्नल यंत्रणा पूर्ववत होईपर्यंत लोकल सेवा उशिराने धावण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply