सोलापूरचा दौरा आटोपल्यानंतर कोल्हापूरच्या दिशेने परतत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या आईची भेट घेतली. आबांच्या आठवणींना उजाळा देताना आईचे डोळे पाणावले. या भेटीनंतर शेट्टी यांनी समाजमाध्यमावर एक भावनिक नोंद केली आहे.
शेट्टी यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील दौरा आटोपून कोल्हापूरकडे परत येत असताना त्यांची पावले अचानक अंजनी गावाकडे वळली. त्यामागे माऊलीने दिलेली मायेची साद आणि स्नेही स्वर्गीय आर. आर. आबा पाटील तसेच त्यांचे बंधू निवृत्त पोलीस अधिकारी आर. आर. पाटील तात्या यांच्या आठवणींचा जिव्हाळा होता. दोन दिवसांपूर्वीच आबांचे लहान बंधू तात्यांनी आईंशी फोन जोडून दिला होता. तेव्हा शेट्टी यांनी आईंना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, तेव्हा त्यांनी अत्यंत हक्काने आणि मायेने सांगितले, “राजू, काहीही कर, पण यंदा दिवाळीला फराळाला अंजनीला यायचंच!”
माऊलीचा प्रेमळ आग्रह
आईचा तो प्रेमळ आग्रह मोडता येणार नाही, असा शब्द मनात ठेवून शेट्टी अंजनी येथील निवासस्थानी गेले. त्यांनी आईची भेट घेतली आणि आबांच्या कुटुंबीयांसोबत कौटुंबिक गप्पा मारल्या. आजही आबांच्या आई या वयातही रोज सकाळी रानात जातात. घरातील जुन्या रिती-रिवाज आणि परंपरा त्या कटाक्षाने सांभाळत असतात, असे शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी यांनी सांगितले की, आर. आर. आबा यांचे बंधू तात्यांची आणि त्यांची गेल्या तीस वर्षांपासून मैत्री आहे. या तीस वर्षांत तात्यांनी कधीच पदाचा किंवा प्रतिष्ठेचा बडेजाव केला नाही. तात्यांचा तीस वर्षांपूर्वीचा पहिला दिवस आणि आजच्या भेटीचा दिवस एकसारखाच आहे. जेव्हा जेव्हा अंजनीच्या या घरात पाऊल पडते, तेव्हा आबांचा तो हसरा चेहरा, त्यांचा साधेपणा आणि दोघांमधील जुने ऋणानुबंध डोळ्यांसमोर उभे राहतात, असे ते म्हणाले.
आठवणींनी पाणावले डोळे
आईंसोबत बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला. आबांच्या आठवणी निघताच आईंचे डोळे थोडे पाणावले आणि त्या भावुक झाल्या. मात्र त्यांच्या पाठीवर पडलेला मायेचा हात आणि त्यांनी दिलेले आशीर्वाद पुढील कार्यात लढण्याची नवी ताकद देऊन गेले, असे शेट्टी यांनी नमूद केले. सार्वजनिक जीवन, दौरे आणि सभा हे सगळे चालूच असते, पण अशा कौटुंबिक भेटींमधून मिळणारी मायेची ऊब मनाला सुखावून जाते, असेही ते म्हणाले.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६१ तास रस्त्यावरची लढाई करत न्याय मिळवून दिल्यानंतर शेट्टी यांनी सोलापुरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हल्लाबोल केला आहे. जर साखर कारखानदारांनी टनाला ३५०० रुपये दर दिला नाही, तर लाखोंच्या संख्येने मोर्चा नेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply