राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी दिवाळीनिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकनेते दिवंगत अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी बारामतीतील अजितदादांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन करत आशीर्वाद घेतले. जय पवार यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जय पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता, Dad. तुमच्या सहवासाने घर उजळलं, तुमच्या प्रेमाने कुटुंब एकत्र राहिलं आणि तुमच्या विचारांनी आयुष्याला दिशा मिळाली. आज तुमच्या स्मृतीस्थळी येऊन आशीर्वाद घेतले. तुम्ही दिलेला प्रकाश कधीही मावळणार नाही.” अशा शब्दांत जय पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करत दिवंगत अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.
अजितदादांशिवाय पवार कुटुंबाची पहिलीच दिवाळी
अजित पवार यांचे विमान अपघातात २८ जानेवारीला बारामतीमध्ये निधन झाले होते. अजित पवार यांच्याशिवाय पवार कुटुंबीयांसाठी ही पहिलीच दिवाळी आहे. या दिवाळीच्या निमित्ताने जय पवार यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बारामतीत अजितदादांच्या स्मृतीस्थळावर जात त्यांनी अभिवादन केले आणि आशीर्वादही घेतले.
राजेंद्र पवार यांचीही भावनिक पोस्ट
राजेंद्र पवार यांनी काल सोशल मीडियावर एक पोस्ट करून अजित पवार यांच्याविषयी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती. अजित पवार यांच्यासोबतच्या लहानपणीच्या दिवाळीच्या आठवणी त्यांनी सांगितल्या होत्या. ‘अजित गेल्यानंतर आज पहिल्यांदाच दिवाळी सुनी-सुनी’, प्रत्येक प्रसंगात आठवण काढणे एवढेच मागे राहिले, अशी भावनिक पोस्ट राजेंद्र पवार यांनी शेअर केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीत यंदा दिवाळी नाही, असे म्हटले होते. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीत पवार कुटुंब यंदा दिवाळीत एकत्र आले नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply