नंदुरबार येथे गवळी समाजातर्फे मंगळवारी, १० तारखेला पाडव्यानिमित्त सगर उत्सव साजरा होणार आहे. नंदुरबारमध्ये गवळी समाजाची सुमारे २०० कुटुंबे असून, पारंपरिक दुग्ध व्यवसायासह हातमजुरी आणि छोटे व्यवसाय यातून समाजबांधव उदरनिर्वाह करतात.
राज्यासह देशात कुठलेही संकट येऊ नये, यासाठी गाई-म्हशींचे पूजन करण्यात येते. गाय आणि म्हैस लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते, तर रेडा यमराजाचे वाहन मानून बलिप्रतिपदेला पाडव्यानिमित्त गाई-म्हशींची मिरवणूक काढण्यात येते. सगर उत्सवानिमित्त गवळी समाजबांधव बंधुभाव जोपासत एकमेकांना शुभेच्छा देतात. सगर उत्सवात रेड्यांची मिरवणूक काढण्यात येते. गवळी समाजबांधव आपल्या गाई-म्हशींना मोरपिसे आणि झेंडूच्या माळा लावून त्यांच्या अंगावर रंगबिरंगी झुली कोरून सजवतात.
मिरवणुकीचा मार्ग आणि वेळ
प्रथा व परंपरेनुसार जुन्या नंदुरबार शहराच्या वेशीवर, म्हणजे मोठा मारुती मंदिर परिसरातील सोनी विहीरजवळ आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाजवळ सगर उत्सव साजरा करण्यात येतो. नंदुरबार शहरातील गवळीवाडा, बालवीर चौक आणि देसाईपुरा परिसरातून गाई-म्हशी व रेड्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. मंगळवारी दुपारी बारा वाजता सगर उत्सवाला प्रारंभ होणार आहे. सोनी विहीरजवळ गवळी समाजातील पंचमंडळी, मानकरी आणि समाजबांधव उपस्थित राहतील.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply