लक्ष्मीपूजनाच्या पावन पर्वावर सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगी मातेचे महालक्ष्मी रूपातील दर्शन भाविकांसाठी भक्तीचा अविस्मरणीय सोहळा ठरले. धन, धान्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री असलेल्या मातेच्या चरणी हजारो भाविकांनी नतमस्तक होत सुख-समृद्धीचे साकडे घातले.
सकाळी अलंकारपूजन, मग मिरवणूक
दीपोत्सवातील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी सात वाजता आदिमायेच्या सुवर्णालंकारांचे न्यासाच्या कार्यालयात विधिवत पूजन झाले. त्यानंतर वाद्यांच्या गजरात अलंकारांची मिरवणूक निघाली; त्यात न्यासाचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ सहभागी झाले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणारी पंचामृत महापूजा देणगीदार भाविक सुधीर सोनवणे यांच्या हस्ते झाली.
फुलांची सजावट आणि महावस्त्रे
लक्ष्मीपूजन व दीपावलीनिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. गाभारा, शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार यांना विविधरंगी फुलांचे तोरण व झुंबर लावण्यात आले. सभामंडपातील आकाशकंदील आणि फुलांच्या आरासीने संपूर्ण परिसर मंगलमय झाला. आदिमायेच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूंना रंगीबेरंगी पुष्परचना करण्यात आली. धुळे येथील भाविक सविता कदम यांच्या माध्यमातून सजावटकार शंकरराव जुन्नरे यांनी मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार व पुरोहित मंडळाच्या सहकार्याने ही पुष्परचना साकारली.
आदिमायेला पोपटी-हिरव्या रंगाची, गुलाबी किनार आणि नक्षीकाम असलेली रेशमी महावस्त्रे परिधान करण्यात आली. मंगळसूत्र, कुयरी हार, पुतळ्यांचे गाठले, कमरपट्टा, नथ, कर्णफुले, पावले आणि तोटे अशा पारंपरिक सुवर्णालंकारांनी मातेचा साजशृंगार करण्यात आला. रात्री आठच्या सुमारास न्यासाच्या कार्यालयात आदिमायेच्या सोन्या-चांदीच्या सर्व अलंकारांचे पुरोहितांच्या मंत्रघोषात विधिवत पूजन झाले. यावेळी न्यासाचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.
दिवसभरात सुमारे वीस हजार भाविकांनी सप्तशृंगी मातेचे दर्शन घेतले. मंदिरातील मंगलमय वातावरण, मंत्रघोष, फुलांची आरास आणि महालक्ष्मी स्वरूपातील आदिमायेचे अलौकिक रूप यामुळे सप्तशृंगगडावर भक्ती, श्रद्धा आणि चैतन्याचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply