अंडर १९ आशिया कप क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. हा सामना ओमानमधील अल अमिरात येथे खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या वेळी अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. आज त्या पराभवाची सव्याज परतफेड करण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरला आहे. आशिया कप १९ वर्षांखालील स्पर्धेतील अ गटाचा हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ कोणतीही कसर सोडणार नाही.
सहवागच्या मुलाकडे सर्वांचे लक्ष
माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सहवागचा मुलगा आर्यवीर सहवाग याच्यावर सर्वांचे विशेष लक्ष असणार आहे. त्याच्या आक्रमक फलंदाजीचा अंदाज हुबेहूब त्याच्या वडिलांची आठवण करून देतो. आर्यवीरने या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात नेपाळविरुद्ध अवघ्या ५२ चेंडूत ४ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ७० धावांची तुफानी खेळी करत भारताला १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला होता. याआधी देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने मेघालयविरुद्ध २९७ धावांची ऐतिहासिक खेळी करून आपली ताकद दाखवली होती.
भारत-पाकिस्तान सामन्यांमधील दबाव आणि हाय-व्होल्टेज वातावरण पाहता, आर्यवीर आपल्या वडिलांप्रमाणेच पाकिस्तानी गोलंदाजांवर सुरुवातीपासून तुटून पडणार का, हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
दोन्ही संघांची दमदार सुरुवात
भारताने आपल्या पहिल्या सामन्यात नेपाळला १० विकेट्सने पराभव करत मोहिमेची दमदार सुरुवात केली होती. भारताने १२८ धावांचे लक्ष्य १९.१ ओव्हरमध्ये गाठले होते. दुसरीकडे, पाकिस्तानने यजमान संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध २२५ धावांचे लक्ष्य ३७.३ ओव्हरमध्ये गाठत ९ विकेट्स राखून विजय नोंदवला होता.
अ गटात अव्वल स्थान मिळविण्याच्या दृष्टीने हा सामना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही लढत जिंकणारा संघ गटात अव्वल राहण्याची शक्यता अधिक आहे. प्रत्येक गटातून अव्वल स्थानी राहणारे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. दोन्ही संघांनी आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे रविवारी होणारा सामना रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानच्या संघात उस्मान खान, जहांगीर बिलाल, अब्दुल कादिर, अहमद हुसैन, अली रझा, हमजा जहूर, हसनैन अब्बास दार, मोहम्मद सय्यम, फरहान युसफ, निकाब शफीक आणि रिजवानउल्लाह यांचा समावेश आहे. भारतीय संघात लक्ष्य राजेश रायचंदानी, आर्यवीर सहवाग, अन्वय द्रविड, अर्जुन राजपूत, इशान सूद, काव्या पटेल, मनाल चौहान, मोहित उलवा, यशवीर गौड, व्हीके विनीत आणि यशवर्धन चौहान खेळत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply