सीईटी परीक्षेत हवे ते केंद्र मिळवून देणे आणि गुण वाढवून देण्याचे कथित आश्वासन देणारी ध्वनिफीत समोर आल्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून उमेदवाराला अपेक्षित केंद्र मिळवून देण्याचा दावा या संभाषणात करण्यात आला आहे.
कथित ध्वनिफितीची सत्यता पडताळणार
या कथित ध्वनिफितीची सत्यता पडताळून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी सीईटी कक्षाने मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे एमएचटी-सीईटी परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सीईटी कक्षाला परीक्षेसंदर्भातील कथित संभाषणाची ध्वनिफीत आणि ध्वनीचित्रफीत प्राप्त झाली होती. या संभाषणानुसार, एका महिलेने दूरध्वनीवरून एका पुरुषाशी बोलताना आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करणे, उमेदवाराची परीक्षा नियोजित पद्धतीने पार पाडणे आणि गुण वाढवून देण्याचे कथित आश्वासन दिल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या संभाषणात आर्थिक व्यवहाराचाही उल्लेख असल्याने सीईटी कक्षाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
पारदर्शकतेला धक्का?
परीक्षा केंद्राचे व्यवस्थापन करून आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात उमेदवाराला अनुचित लाभ मिळवून देण्याबाबतची कथित विधाने गंभीर आणि आक्षेपार्ह असल्याचे सीईटी कक्षाने म्हटले आहे. यामुळे परीक्षेची पारदर्शकता, निष्पक्षता आणि विश्वासार्हता धोक्यात येते. त्यामुळे संभाषणाची सत्यता पडताळणे, संबंधित व्यक्तींची ओळख निश्चित करणे आणि त्यामागील पार्श्वभूमी तपासणे आवश्यक असल्याचे सीईटी कक्षाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, या प्रकरणात कोणत्याही बाधित उमेदवाराकडून अद्याप लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. तरीही, गांभीर्य लक्षात घेऊन सीईटी कक्षाने पोलिसांत तक्रार केली आहे. ध्वनिफितीची ध्वनीचित्रफीत पेनड्राइव्हमध्ये पोलिसांना सादर करण्यात आली असून, तिची तांत्रिक तपासणी करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
दिशाभूल करणाऱ्या पोस्ट हटवल्या
सोशल मीडियावर सीईटी परीक्षेबाबत चुकीची, अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित होत असल्याच्या तक्रारींची दखल घेऊन सीईटी कक्षाने स्वतंत्र कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाने २०२७ च्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्याप्रकरणी डिजिटल मास्टर या यूट्युब चॅनेलला आणि नाशिकच्या स्पेक्ट्रम अकॅडमीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्यानंतर डिजिटल मास्टरने युट्यूबवरील संबंधित व्हिडीओ, तर स्पेक्ट्रम अकॅडमीने इन्स्टाग्रामवरील रील हटवली. सीईटी परीक्षेसंदर्भातील चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती आढळल्यास विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी socialmedia.complaints@mahacet.org या ईमेलवर तक्रार करावी, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply