दहिवडी: माण तालुक्यात पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. परतीच्या मान्सूनवर शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले होते. मात्र, मान्सूनच्या पावसानेही पाठ फिरवल्यामुळे पाणीटंचाईचे संकट गडद होत चालले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूगर्भातील पाणीपातळी खालावली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या तालुक्यातील विविध गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
माण तालुका हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे-मलवडी आणि वरकुटे कुकुडवाड परिसरासह तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पावसाचे प्रमाण आणि पावसातील खंड यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
जलसाठ्यांची स्थिती चिंताजनक
सध्या तालुक्यातील आंधळी धरणात ४९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर राणंद तलावात केवळ ०.२ टक्के आणि जाशी तलावात २.५३ टक्के इतकाच पाणीसाठा उरला आहे. तलावांसह विविध जलसाठ्यांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. तलावांमध्ये पाणी असले तरी त्याचा वापर, उपलब्ध साठा आणि वाढती पाण्याची मागणी यांचा विचार करता प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान आहे.
पाण्याबरोबर चारा टंचाईचेही संकट
पाणीटंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी आणि चारा या दोन्ही समस्यांवर प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यावर्षी अत्यल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने माणगंगा नदी नैसर्गिकरित्या प्रवाहित झाली नाही. नदी प्रवाहित करण्याच्या अनुषंगाने आणि पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिहे कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणातून माणगंगा नदीत सोडण्यात आले. उरमोडी योजनेचे कालव्याद्वारे येणारे पाणी लोधवडे, काळेवाडी, गोंदवले बुद्रुक, गोंदवले खुर्द आणि पिंपरी मार्गे माणगंगा नदीत सोडून नदी प्रवाहित करण्यात आली. परिणामी, माणगंगा नदीकाठच्या परिसरातील शेती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. सध्या मात्र माणगंगा नदीत सोडलेले पाणी आटण्याच्या मार्गावर आहे. नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि सिमेंट साखळी बंधारे कोरडे पडू लागले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply