येवला शहरातील अंबिया शाह कॉलनी परिसरात शनिवारी दुपारी भंगार गोदामाला लागलेल्या भीषण आगीने शहरात एकच खळबळ उडाली. गोदामामधील ज्वलनशील साहित्यामुळे आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणावर भडकल्या. या आगीत गोदामासह परिसरातील चार घरांनाही झळ बसली. आगीची तीव्रता इतकी होती, की संपूर्ण शहरातून धुराचे लोळ दिसत होते. घरांमधील लोखंडी साहित्य वितळले, तर गॅस टाकीचा स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला.
ज्वलनशील साहित्यामुळे आग भडकली
शहरातील अंबिया शाह कॉलनी भागात उस्मान सलीम अन्सारी यांच्या भंगार गोदामामध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर, प्लास्टिक, टायर, रद्दी आणि रबरी साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. या साहित्याने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळांनी काही वेळातच भीषण स्वरूप धारण केले. आगीची झळ इम्रान अन्सारी, लल्लू हाजी, सोहेल अन्सारी आणि इस्माईल शहा यांच्या घरांपर्यंत पोहोचली. आगीचे मोठमोठे लोळ आणि धुराचे लोट आकाशात झेपावत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. आजूबाजूच्या नागरिकांची धावपळ उडाली. संभाव्य धोका लक्षात घेऊन अनेक कुटुंबांनी घराबाहेर धाव घेतली. काही नागरिकांनी अंगावरील कपड्यांनिशी आणि हाताला लागेल ते साहित्य घेऊन घर सोडले. गॅस टाकीच्या स्फोटाने परिसरातील नागरिकांमध्ये आणखी घबराट पसरली.
अरुंद रस्त्यांमुळे अडथळा
येवला नगरपरिषदेचा अग्निशमन बंब माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाला. मात्र, रस्ते अरुंद झाल्याने अग्निशमन वाहनाला घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. नागरिकांची गर्दी आणि अरुंद रस्त्यांमुळे आग विझविण्याच्या कामातही अडथळे निर्माण झाले. गोदामामधील ज्वलनशील साहित्यामुळे आग सातत्याने भडकत असल्याने अग्निशमन जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आगीची भीषणता लक्षात घेऊन कोपरगाव, मनमाड आणि निफाड येथील बंबांनाही पाचारण करण्यात आले. विविध ठिकाणांहून आलेल्या अग्निशमन पथकांनी संयुक्तपणे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय साहाय्यक बाळासाहेब लोखंडे, तहसीलदार आबा महाजन आणि पोलिस निरीक्षक संदीप मंडलीक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
दिवाळीच्या खरेदीमुळे शहरातील बाजारपेठेत मोठी गर्दी होती. शनी पटांगण परिसरातही नागरिकांची वर्दळ असताना आगीमुळे धुराचे लोट या भागापर्यंत पोहोचले. धुरामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागला. आग पाहण्यासाठी नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे अग्निशमन वाहनांच्या हालचालींनाही अडथळे निर्माण झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भंगार गोदामासह चार घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांची आर्थिक हानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. नुकसानीचा नेमका आकडा आणि आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply