थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी महावितरणने ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीदार ग्राहकांचे संपूर्ण व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. तसेच मूळ थकबाकीची एकरकमी रक्कम भरल्यास त्यावर २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत दिली जाणार आहे. घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना १५ जानेवारी २०२७ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. ५) कंपनीच्या प्रकाशगड येथील मुख्यालयात या योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
ग्राहकांना थकबाकीतून मुक्त होण्याची संधी देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये एकूण थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार शंभर टक्के माफ केला जाणार आहे. उर्वरित मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यातही २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल. योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना मागणीनुसार वीजजोडणी तातडीने पुन्हा सुरू करून दिली जाणार आहे.
कोणाला मिळणार लाभ?
३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्चदाब आणि लघुदाब वर्गवारीतील बिगरकृषी ग्राहकांना या योजनेत सहभागी होता येईल. तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनाही याचा लाभ घेता येणार आहे. महावितरणच्या वितरण फ्रँचायझी क्षेत्रातील ग्राहकांसाठीही ही योजना लागू आहे.
३४ लाख ग्राहकांकडे ७,६५० कोटींची थकबाकी
३१ मार्च २०२६ पर्यंत कृषी आणि सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना वगळता अन्य बिगरकृषी वर्गवारीतील ३४ लाख ८६ हजार ग्राहकांकडे सात हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये एक हजार ८३५ उच्चदाब आणि ३४ लाख ८४ हजार ५१३ लघुदाब ग्राहकांचा समावेश आहे. या थकबाकीतील दोन हजार ९२ कोटी रुपयांचे व्याज आणि विलंब शुल्क माफ होणार आहे. दरम्यान, ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या दोन लाख ६० हजार ८२९ ग्राहकांकडे ४८८ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये उच्चदाबाचे १९ आणि लघुदाबाचे दोन लाख ६० हजार ८१० ग्राहक आहेत. या ग्राहकांचे १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याजही पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply