दिवाळीचा फराळ करताना कधी लाडवांना तूप जास्त होते, कधी चिवडा तेलकट होतो, तर कधी शंकरपाळेच विरघळून जातात. दिवाळीच्या निमित्ताने मराठी अभिनेत्रींनी त्यांच्या फराळाच्या काही मजेशीर आठवणी सांगितल्या आहेत. कोणाला बेसनाचा लाडू बनवण्यात मास्टरी आहे, तर कोणाला उत्तम जमतात अनारसे. एकीचा चिवडा मात्र पहिल्याच प्रयत्नात बिघडला होता.
ऐश्वर्या नारकर: पहिल्या चिवड्याची गडबड
लग्नानंतरच्या पहिल्याच दिवाळीत आईला विचारून चिवडा करण्याचा प्रयत्न केला. खोबरे, दाणे आणि हिरवी मिरची आधीच तळून घेतली आणि त्याच गरम तेलात मोहरी टाकली. तेल आधीच तापलेले असल्याने मोहरी करपली. त्यातच पोहे टाकले आणि तेलही खूपच जास्त झाले होते. शेवटी चिवडा इतका तेलकट झाला की तो टिशूने पुसत बसावे लागले. दोन किलो चिवडा असल्याने तो तसाच खावा लागला. पहिल्या वर्षीचा तो चिवडा मोठा धडा ठरला. आज मात्र परिस्थिती उलट आहे. आता चिवडा करण्यात त्या एक्सपर्ट झाल्या आहेत. दिवाळी आली की घरात चिवडा करण्याचे काम त्यांच्याच वाट्याला येते आणि त्याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटतो.
कविता लाड: लाडवांच्या तुपाचे गणित चुकले
घरात सगळ्यांनाच बेसनाचे लाडू थोडे जास्त तुपकट आवडतात. यंदा गणेशोत्सवात लाडू बनवताना तुपाचे प्रमाण थोडे कमी झाले होते, तर आता दिवाळीसाठी बनवताना ते जरासे जास्तच झाले. घरी येणाऱ्या मावशीने सांगितले की ते जरावेळ असेच ठेव आणि मग वळायला घे, नाहीतर ते वळलेच जाणार नाहीत. यंदा दिवाळीत कणकेचे शंकरपाळे करून पाहण्याचे ठरले आणि ते केलेही. पण काही पदार्थ मैद्याचेच जास्त छान होतात, असे त्यांना वाटते. शंकरपाळ्यांच्या बाबतीतही मैद्याच्या शंकरपाळ्यांची चव अधिक छान लागते, हे त्यांना हा प्रयोग केल्यानंतर समजले.
प्राजक्ता दिघे: बटाट्याच्या शेवेची खासियत
वर्षानुवर्षे दिवाळीचा फराळ त्या घरीच बनवतात. लाडू, चकली, शंकरपाळे असे विविध पदार्थ बनवायला त्यांना आवडते. मात्र त्यांच्या हातच्या बटाट्याच्या शेवेची गोष्टच वेगळी आहे. घरात फराळाचे इतर सगळे पदार्थ केले जातातच, पण त्याच्या जोडीला बटाट्याची शेव हवीच, अशी सगळ्यांची मागणी असते. अगदी चित्रीकरणाच्या सेटवरही त्यांच्या हातच्या शेवेचे कौतुक होते. विशेष म्हणजे बटाट्याची शेव बनवायला त्या लग्नानंतर शिकल्या. समोर राहणाऱ्या एका काकूंची ती खासियत होती. त्यांच्याकडून शिकून घेतल्यापासून त्यांना ती अगदी परफेक्ट जमते. माहेरी असो किंवा सासरी, आजवर त्यांच्या हातचे फराळाचे पदार्थ कधीच फसले नाहीत.
सुप्रिया पाठारे: अनारसे उत्तम जमतात
एकदा शंकरपाळे बनवताना त्यांचा प्रयोग फसला होता. कढईत तळणीसाठी जसे शंकरपाळे सोडले, तसे ते विरघळून गेले आणि पीठही पुन्हा वापरण्यायोग्य राहिले नाही. शेवटी त्याच पिठाचे कटलेटसारखे आकार करून शॅलो फ्राय करून खाल्ले होते. मात्र अनेकांना जो पदार्थ किचकट किंवा बनवायला कठीण वाटतो, तो त्यांना अगदी छान जमतो. तो पदार्थ म्हणजे अनारसे. अनारसे बनवण्यासाठी तांदूळ तीन-चार दिवस भिजत ठेवून त्याचे पाणी बदलत राहावे लागते. त्यामुळे अनेक जण ते बनवण्याचे टाळतात. पण त्यांना ही प्रक्रिया अजिबात अवघड वाटत नाही. प्रत्येक गोष्टीचे प्रमाण योग्य असले की उत्तम अनारसे तयार होतात. त्यांची मुलगीही आवर्जून सांगते की इतर कोणतेही फराळाचे पदार्थ केले नाहीत तरी चालतील, पण अनारसे मात्र केलेच पाहिजेत. त्यामुळे आता अनारसे ही त्यांची खासियत झाली आहे.
सुचित्रा बांदेकर: बेसनाचा लाडू बनवण्यात मास्टरी
चित्रीकरणाच्या धावपळीत फारसा वेळ मिळत असला, तरी दिवाळीत त्या आवर्जून बेसनाचे लाडू बनवतात. सुरुवातीला उत्साहाच्या भरात एक किलो बेसनाचे लाडू करण्याचा घाट घातला होता. चित्रीकरणावरून रात्री घरी आल्यानंतर रोज थोडे थोडे बेसन भाजून ठेवायच्या. मात्र आई नेहमी सांगायची की अजून थोडे भाजायला हवे होते. एकदा लाडू वळून ठेवले होते, पण सकाळी उठून पाहिले तर तुपाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे सगळे लाडू पुन्हा पसरून त्याची चपटी झाली होती. त्यामुळे पुन्हा लाडू वळण्याची वेळ आली. मात्र या सगळ्या अनुभवांतून आता बेसन किती खमंग भाजायचे आणि तुपाचे प्रमाण किती असावे, याचा अंदाज आला आहे. आता त्यांचे बेसनाचे लाडू अगदी छान होतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply