मुंबईची स्वच्छता राखण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील स्वच्छता कर्मचाऱ्यांना केवळ सेवा निवासस्थानच नाही, तर मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. कुलाब्यातील पंचशील नगर येथे १४० सदनिकांच्या प्रकल्पाचे उद्घाटन आणि चावीवाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचारी स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यामुळे त्यांना चांगले आणि प्रशस्त घर उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थानासोबत मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आणि वाल्मिकी गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना घरांची सुविधा दिली जात आहे. २०२८ पर्यंत सेवा निवासस्थान उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे.
प्री-फॅब तंत्रज्ञानाने उभारली १४० घरे
कुलाब्यातील पंचशील नगर येथे दोन इमारतींमध्ये एकूण १४० सदनिका बांधण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेने पहिल्यांदाच प्री-फॅब्रिकेटेड तंत्रज्ञानाचा वापर करून ही इमारत उभारली आहे. या इमारतींमध्ये लिफ्टसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
१५० ऐवजी मिळणार ३०० चौरस फुटांची घरे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेच्या २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना दर्जेदार निवासस्थान उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू झाला आहे. आधी १५० चौरस फुटांचे घर मिळत होते, आता ३०० चौरस फुटांचे घर देण्यात येत आहे. आश्रय योजनेंतर्गत ३० वसाहतींचा ३५ प्रकल्पांच्या माध्यमातून तीन टप्प्यांत पुनर्विकास केला जाणार आहे. यामध्ये ३०० चौरस फुटांची ११,३७१ आणि ६०० चौरस फुटांची ७७३ घरे अशी एकूण १२,१४४ घरे उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, इंजिनिअर आणि वकील व्हावे, यासाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला दिले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply