मिरा-भाईंदरमधील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनाच्या लोकार्पणानंतरही नागरिकांसाठी त्याचे दरवाजे बंद असल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. दिवाळीच्या निमित्ताने हे कलादालन किमान सात दिवस शाळकरी मुलांसाठी खुले करावे आणि त्यानंतरही नियमितपणे सुरू ठेवावे, अशी स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली. विशेष म्हणजे, कलादालनाच्या देखभालीसाठी दरमहा लागणारा सुमारे १० लाख रुपयांचा खर्च उचलण्याची तयारीही सरनाईक यांनी दर्शवली.
दरमहा सुमारे १० लाख रुपये खर्च
महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अहवालानुसार, कलादालनाची सुरक्षा, स्वच्छता, कर्मचारी, तिकीट व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर, सीसीटीव्ही आणि उद्वाहक यांच्या देखभालीसाठी दरमहा सुमारे १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच इमारत अद्याप कंत्राटदाराकडून महापालिकेच्या ताब्यात आलेली नसल्याचे आणि कलादालन चालविण्याबाबतचे धोरणही निश्चित झाले नसल्याचे सांगितले जात आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती आणि खर्चाची जबाबदारी यावरून कलादालन सुरू करण्यास विलंब होत असेल, तर महापौरांनी याबाबत लेखी पत्र द्यावे. महापालिकेला दरमहा दहा लाखांचा खर्च परवडत नसेल, तर हा संपूर्ण खर्च उचलण्याची माझी तयारी आहे, असे प्रताप सरनाईक यांनी ठणकावून सांगितले.
कलादालन तातडीने नागरिकांसाठी खुले करण्याची मागणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत या कलादालनाचे लोकार्पण करण्यात आले होते. विज्ञान केंद्र, बालविभाग, सभागृह, प्रदर्शन दालने, वाचनालय आणि उपाहारगृह अशा विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, लोकार्पण होऊनही अद्याप हे कलादालन नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीच्या काळात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागायची आणि त्यांच्याच नावाने उभारलेल्या कलादालनाला विरोध करायचा, ही भूमिका योग्य नसल्याची टीका त्यांनी केली. बाळासाहेबांच्या विचारांचा आणि नावाचा सन्मान राखायचा असेल, तर हे कलादालन तातडीने नागरिकांसाठी खुले झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका सरनाईक यांनी मांडली. आता प्रताप सरनाईक यांनी स्वतः महिन्याचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवल्यानंतर तरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कलादालनाचे दरवाजे नागरिकांसाठी खुले होणार का, याकडे मिरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply