पेंग्विनच्या मुद्द्यावरून मुंबईत सुरू असलेल्या राजकीय वादात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. पेंग्विन आणण्यापेक्षा मुंबईकरांचा पाणीप्रश्न आधी सोडवावा, अशी त्यांची मागणी आहे. पेंग्विन आणण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती, असे पेडणेकर यांनी सांगितले. त्यावेळी विरोध करणारेच आता त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
पेंग्विनची संख्या आता २५ झाली असून, त्यातील काही जोड्या म्हैसूरला पाठविण्याची चर्चा आहे. त्यासाठी काही अधिकारी भेट देऊन गेल्याचेही समजते. त्याऐवजी मुंबईत जिराफ आणि सिंह आणले जाणार असल्याची माहिती मिळत असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले.
पेंग्विन मुंबईत आणले तेव्हा याच लोकांनी त्यावरून मोठे राजकारण केले होते. एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतरही टीका करण्यात आली. मात्र, आज हेच पेंग्विन मुंबईकरांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहेत. त्याचबरोबर मुंबईच्या तिजोरीतही मोठ्या प्रमाणात भर घालत आहेत. प्राणी-पक्ष्यांची देवाणघेवाण ही काही नवीन बाब नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईकरांना पेंग्विन नको, आधी पाणी द्या!
मुंबई सध्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येला सामोरी जात आहे. दिवाळीनंतर निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष दिसत नाही. नागरी सुविधांच्या प्रश्नांवरही चर्चा होत नाही. पक्षी आणले पाहिजेत, त्याला आमचा विरोध नाही; पण ही त्याची वेळ नाही. सध्या मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे त्यांना पेंग्विनपेक्षा पाणी महत्त्वाचे आहे, अशा शब्दांत पेडणेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
गेली साडेचार ते पावणेपाच वर्षे मुंबई महापालिकेत नगरसेवकांची लोकनियुक्त सभा नव्हती. आता नगरसेवक निवडून आले आहेत, महापौरही विराजमान झाले आहेत. अशा वेळी मुंबईकरांच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष देण्याऐवजी सीए आणा, पेंग्विन आणा, अशा विषयांवर चर्चा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
पेंग्विन आणण्याची संकल्पना आदित्य ठाकरे यांची होती. ती इतकी यशस्वी ठरली की आता त्याची दखल घ्यावी लागत आहे. मात्र, त्याचे श्रेय घेऊन मिरवण्याची ही वेळ नाही. मुंबईकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर आधी चिंता व्यक्त करा, असा टोला पेडणेकर यांनी लगावला.
प्रदूषणाच्या प्रश्नावरही लक्ष वेधले
मुंबईकरांचे आरोग्य, वाढते प्रदूषण आणि नागरी समस्यांवरही सत्ताधाऱ्यांनी बोलले पाहिजे, असे पेडणेकर म्हणाल्या. मुंबईत वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि दृश्य प्रदूषण वाढत आहे. राजकारणातही प्रदूषण निर्माण झाले असून, या महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका त्यांनी केली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply