कारंजा आणि मानोरा तालुक्यांमधील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सज्ज राहावे, असे निर्देश कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सई डहाके यांनी अधिकाऱ्यांना दिले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी दोन्ही तालुक्यांतील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. पाणीपुरवठा, पाणीटंचाई आणि जनावरांच्या चारा टंचाईबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
बैठकीला कोणते अधिकारी उपस्थित होते
या आढावा बैठकीला आमदार सई डहाके यांच्यासह देवव्रत डहाके, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, कारंजा तहसीलदार रवी महाले, मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी पूनम राणे, कृषी अधिकारी अश्विनी भोसले आणि पशुधन विकास उपायुक्त डॉ. रवी ठाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संकटाच्या काळात नागरिक आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, कोणत्याही गावात पाणी व चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे आमदार डहाके यांनी सांगितले. यामध्ये कुणीही कुचराई करता कामा नये आणि जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच संकटसमयी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
गावनिहाय टंचाईचा आढावा
आढावा बैठकीत आमदार डहाके यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. गावनिहाय पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बुलढाण्यातही आढावा बैठक
दरम्यान, बुलढाण्यातही संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी धाड येथे आमदार श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समन्वय बैठक पार पडली. या आढाव्यादरम्यान विविध विभागांच्या नियोजनात त्रुटी आणि समन्वयाचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार महाले यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन, ग्रामीण पाणीपुरवठा, जलस्रोतांची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व पाणी तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना द्यावयाच्या मदतीसंदर्भात चर्चा करण्यात आली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply