सणासुदीच्या काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असताना अन्न व औषध प्रशासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या तपासणीत विविध आस्थापनांमधून एकूण ५.२ टन खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. त्यातील ५५९ किलो संशयित साठा नष्ट करण्यात आला.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मिठाई दुकाने, खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. काही ठिकाणी अस्वच्छता, अयोग्य साठवणूक, खाद्यरंगाच्या वापरातील त्रुटी आणि आवश्यक परवान्यांचा अभाव आढळून आला. त्यामुळे संबंधितांवर निलंबन तसेच व्यवसाय बंद करण्याची कारवाई करण्यात आली.
सर्वाधिक मोठा साठा पिंपरीत
या कारवाईत सर्वाधिक मोठा साठा पिंपरी सांदस येथील नायकवाडे डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्समध्ये आढळला. तेथून ३,०९९ किलो खवा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत ९ लाख २९ हजार ७०० रुपये आहे.
कोठून किती साठा जप्त झाला
नारायणगाव येथील भैरवनाथ फूड्समधून ६६६ किलो महिम हलवा आणि बदाम हलवा, मोशीतील बिकानेर स्वीट्समधून १६० किलो बर्फी, रावेत येथील माधव मिठासमधून १४२ किलो केसरी पेढा व बालुशाही, चिंचवडमधील बंधन स्वीट्समधून ११९ किलो मीठा मावा, मुळशीतील सफा अर्शी स्वीट होममधून ९७ किलो सुटी बुंदी, रावेत येथील बंधन स्वीट्समधून ९१ किलो कलाकंद व पेढा, दापोडीतील रुची मिष्ठान भंडारमधून ७० किलो मावा, शिरूर येथील हिंदवी एजन्सीमधून ५२ किलो स्वीट हलवा, शिवणे येथील कन्हैया स्वीट्समधून ५१ किलो बर्फी व बुंदी आणि वडगाव बुद्रुक येथील पंचाली स्वीट्समधून चार किलो मोतीचूर लाडू जप्त करण्यात आला. बिबवेवाडीतील एका आस्थापनाकडून २०० किलो शेव व बुंदीही ताब्यात घेण्यात आली.
नाशवंत आणि संशयित असुरक्षित स्वरूपाचे खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले. अन्न व्यावसायिकांनी आवश्यक परवाने व नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, उत्पादन व विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता राखावी आणि खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक व हाताळणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply