आयुष वैद्यकीय शिक्षणांतर्गत असलेल्या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी तीन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तिसऱ्या फेरीअखेर राज्यातील २०४ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध १३ हजार ७५० पैकी ११ हजार ५९२ जागांवर प्रवेश झाले आहेत. हे प्रमाण ८४.३० टक्के आहे. उर्वरित जागांवर प्रवेशासाठी पुढील वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.
अभ्यासक्रमनिहाय स्थिती
आयुर्वेद (बीएएमएस) अभ्यासक्रमात ८७.६२ टक्के प्रवेश झाले आहेत. राज्यातील १३९ आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये उपलब्ध नऊ हजार ३०३ पैकी आठ हजार १५२ जागा भरल्या असून एक हजार १५१ जागा रिक्त आहेत. शासकीय २३ महाविद्यालयांमध्ये बीएएमएसच्या एक हजार ६७२ पैकी एक हजार ५४७ म्हणजे ९२.५२ टक्के जागा भरल्या आहेत. खासगी ११६ महाविद्यालयांमध्ये उपलब्ध सात हजार ६३१ पैकी सहा हजार ६०५ जागांवर प्रवेश झाले असून एक हजार २६ जागा रिक्त आहेत.
होमिओपॅथी (बीएचएमएस) अभ्यासक्रमात राज्यातील ५७ महाविद्यालयांमध्ये एकूण चार हजार १९ जागांपैकी तीन हजार ४२ म्हणजे ७५.६९ टक्के प्रवेश झाले असून ९७७ जागा रिक्त आहेत. युनानी (बीयूएमएस) अभ्यासक्रमात राज्यातील आठ महाविद्यालयांमध्ये एकूण ४२८ पैकी ३९८ म्हणजे ९२.९९ टक्के जागांवर प्रवेश झाले आहेत.
रिक्त जागांसाठी पुढील फेरी
तिसऱ्या फेरीअखेर एकूण दोन हजार १५८ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा पुढे स्ट्रे राऊंडसाठी उपलब्ध असतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply