सण-उत्सवाच्या काळात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने उत्तर महाराष्ट्रात विशेष तपासणी मोहीम हाती घेतली होती. १६ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या काळात राबवलेल्या या मोहिमेत विभागातील १२० अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. या कारवाईत तीन कोटी ७८ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा दोन लाख २७ हजार किलोग्रॅम अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
पाच जिल्ह्यांत तपासणी
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक, अहिल्यानगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यांमध्ये तपासणी करण्यात आली. जिल्हानिहाय निलंबित परवान्यांची संख्या अशी — नाशिक ६५, जळगाव २३, धुळे १३, अहिल्यानगर १० आणि नंदुरबार ९.
मिठाई, चिवडा, खाद्यतेल, मसाले, फरसाण, खोया, बटर, पॅकबंद पिण्याचे पाणी, खवा, मावा आणि भगर या पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये मसाले, खाद्यतेल, मिठाई आणि फरसाण यांचे प्रमाण अधिक होते.
तपासणीत काय आढळले?
अनेक ठिकाणी अन्नपदार्थांची साठवणूक अस्वच्छ आणि अयोग्य पद्धतीने केली जात असल्याचे समोर आले. काही पदार्थ विहित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला. लेबलिंगच्या नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने ब्रँडिंग केल्याचेही आढळले. खाद्यतेलाच्या पुनर्पॅकिंगसाठी वापरलेल्या डब्यांचा बेकायदेशीर पुनर्वापर होत होता. पॅकिंगवर ‘फोर्टिफाइड ऑईल’ असा दावा असतानाही वैध फोर्टिफिकेशन परवाना आढळला नाही. मिठाई तयार करताना विहित मर्यादेपेक्षा जास्त खाद्यरंग वापरल्याचेही निदर्शनास आले.
नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास नागरिकांनी complaints.mahafda.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. अन्न व्यावसायिकांनी परवाना घेऊनच नियमांनुसार व्यवसाय करावा, असेही सांगण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply