दुष्काळाच्या सावटात प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचावा, दिव्यांग बांधवांची दिवाळी आनंददायी व्हावी तसेच शेतकऱ्यांच्या मनातील चिंतेला संवादातून दिलासा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने घरपोच धान्य उपलब्ध करून दिले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जनतेशी संवाद साधला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य, दिव्यांग बांधव आणि शेतकऱ्यांची दिवाळी आनंददायी व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी प्रसाद यांनी शुक्रवारी (६ नोव्हेंबर) म्हसरुळ येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ३३ येथे भेट दिली. त्यानंतर दिंडोरी तालुक्यात पालखेड येथील कविता सोळसे या दिव्यांग लाभार्थीच्या घरी भेट दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सोळसेंना अन्नधान्याचे घरपोच वितरण करण्यात आले. उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, तहसीलदार पंकज पवार, पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांशी संवाद; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आणि चिंता जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निफाड तालुक्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पाच हजार रुपयांचा लाभ मिळाला आहे का, याची विचारणा करत त्यांनी शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेतली. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असल्याने पाण्याचा काळजीपूर्वक व नियोजनपूर्वक वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे उपस्थित होते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थींना शंभर टक्के धान्य वाटप करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले. एखादा पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहिल्यास त्याला शनिवार (७ नोव्हेंबर) पर्यंत धान्य उपलब्ध करून दिले जाईल. यंत्रणांना तशा सूचना केल्या आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply