त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात काही त्रुटी राहिल्याने स्थानिक नागरिकांसह बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना अडचणींना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर आगामी कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजन, भाविकांची सुरक्षितता, प्रवेशपत्रांचे वाटप, पायाभूत सुविधा आणि विकासकामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष देण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय आणि सामंजस्याने कामे गतीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या विषयावर गुरुवारी (५ नोव्हेंबर) त्र्यंबकेश्वर येथे विचारमंथन बैठक झाली. बैठकीला खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपनगराध्यक्षा पल्लवी शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपुत आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील संवादावर भर
खासदार वाजे यांनी सिंहस्थात भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. आमदार खोसकर यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा तुंगार यांनी कुंभमेळ्याच्या दृष्टीने शहरातील विकासकामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सर्व विभागांनी त्यांच्या कामांचा नियमित आढावा घेऊन प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश दिले. डॉ. स्वामी यांनी आगामी कुंभमेळ्यातही सुरक्षा आणि बंदोबस्ताच्या दृष्टीने समन्वय महत्त्वाचा राहणार असल्याचे सांगितले. तहसीलदार गणेश जाधव यांनी ध्वजारोहण सोहळ्याच्या आयोजनाची माहिती दिली. महसूल, महावितरण, कृषी, पोलीस, पुरातत्त्व आणि प्रादेशिक परिवहन विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत प्रलंबित विकासकामांना गती देणे, प्रवेशपत्रांचे वितरण अधिक सुलभ करणे, प्रवेशासाठीच्या याद्यांची पडताळणी करणे आणि शहरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply