नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा येथील खासगी प्राथमिक शाळेत दिवाळीचा उत्सव दरवर्षी अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. शाळेची पटसंख्या ७५ असून, शाळेत शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मुख्याध्यापक संतोष यशवंत नांद्रे आणि शिक्षिका वृषाली संतोष नांद्रे हे शिक्षक दांपत्य गेल्या दहा ते बारा वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार दिवाळीनिमित्त वेगवेगळे फराळाचे पदार्थ शाळेतच विद्यार्थ्यांसमवेत तयार करून घेत आहे. पदरमोड करत विद्यार्थ्यांची दिवाळी गोड करण्याचा हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो.
शाळेतच फराळ, प्रत्येकाला २५० ग्रॅम
यंदा विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शाळेत शेवचिवडा, मोहनथाळ आणि बर्फी असा दिवाळीचा फराळ तयार करण्यात आला. प्रति विद्यार्थ्याला दोनशे पन्नास ग्रॅम फराळ वाटप करण्यात आला. शाळेतील स्वयंपाकीण ताईंना दिवाळीनिमित्त साडी चोळीची भेट दिली जाते. शालेय अभ्यासक्रमात कोणताही खंड पडू न देता विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. कार्यशिक्षण, स्वावलंबन, सहकार्य आणि एकता यांचे धडे यानिमित्ताने विद्यार्थ्यांना दिले जातात.
रांगोळी, आकाश कंदील आणि शपथ
यंदा प्रथम सत्राच्या शेवटच्या दिवशी शाळेत सडा रांगोळी काढून विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश कंदील लावून शाळेचा परिसर सुशोभित करण्यात आला. दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रत्येक सण-उत्सवाचे महत्त्व समजावून सांगितले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, दिवाळीत सडा रांगोळीसह आकाश कंदील आणि पणत्या तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. पोषण आहारात सर्व प्रकारच्या भाजीपाल्याचा समावेश करत व्हेज पुलाव दिला जातो. मध्यान्ह भोजनानंतर दीपोत्सवाचे महत्त्व समजावून प्रदूषणमुक्त आणि व्यसनमुक्त दिवाळीची शपथ विद्यार्थ्यांना दिली जाते. दिवाळीच्या अभ्यासासाठी पदरमोड करत लेखन साहित्य पुरवले जाते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा वाढदिवस शाळेतच साजरा केला जातो; औक्षण करून लेखन साहित्य भेट देऊन प्रेरणा दिली जाते. शिक्षकांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पावभाजीची मेजवानी दिली जाते. सरपंच, सर्व सदस्य, शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. पाटील आणि केंद्रप्रमुख जुबेर तांबोळी यांनी या उपक्रमाचे नेहमीच कौतुक केले आहे. शाळा आणि विद्यार्थी हेच आपले कुटुंब असल्याचे मुख्याध्यापक संतोष नांद्रे यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply