मालेगाव तालुक्यातील देवघट गावाजवळील पाझर तलावातून विद्युत मोटारींच्या मदतीने सुरू असलेला बेकायदा पाणी उपसा आता थांबणार आहे. या उपशावर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे उपविभागाने वीज वितरण कंपनीला लेखी सूचना दिल्या आहेत.
बेकायदा वीजजोडण्या खंडित करण्याचे निर्देश
उपविभागाच्या उपअभियंत्यांनी उपकार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून तलाव परिसरातील बेकायदा वीजजोडण्या तातडीने खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुका भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य प्रशांत देसले यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. सार्वजनिक जलसाठ्यातून काही व्यक्ती अनधिकृतपणे विद्युत मोटारी लावून पाणी उपसत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर महावितरण विभागाने तलाव परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि बेकायदा उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या मोटारी व संबंधित वीजजोडण्यांवर कारवाई करून वीजपुरवठा तत्काळ खंडित करावा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
पाणीसाठा महत्त्वाचा; टंचाईची भीती
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या तक्रारीची उपअभियंत्यांनी गंभीर दखल घेत महावितरण प्रशासनाला पत्र पाठवले आहे. पाझर तलावातील पाणीसाठा परिसरातील भूजल पुनर्भरण, विहिरींची पाणीपातळी वाढवणे आणि स्थानिक नागरिकांची पाण्याची उपलब्धता कायम राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. असाच अनधिकृत उपसा सुरू राहिल्यास उपलब्ध साठा झपाट्याने कमी होऊन येत्या काळात शेतकरी व ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, याकडे संबंधितांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply