मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐन दिवाळीत पालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबईतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना २०२८ पर्यंत सेवानिवासस्थान उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
कुलाबा येथील राजवाडकर स्ट्रीट, पंचशील नगर येथे आश्रय योजना कक्षाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत दोन इमारती बांधण्यात आल्या आहेत. या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी ३०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेली नवीन १४० सेवानिवासस्थाने उपलब्ध झाली आहेत. या सदनिकांमध्ये स्वतंत्र स्नानगृह आणि शौचालयासोबत विविध सोयीसुविधा उपलब्ध आहेत.
जुन्या घरांऐवजी आधुनिक सदनिका
कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, आश्रय योजनेअंतर्गत वर्षानुवर्षे १५० चौरस फुटाच्या पडक्या घरामध्ये सामूहिक संडासाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता ३०० फुटांचे घर देण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही इमारत तयार करण्यात आली असून तिचे आयुष्य १०० वर्षांचे आहे. जवळपास ३० ते ४० टक्के जागा मोकळी ठेवण्यात आली आहे. सामूहिक सोयी आणि सामूहिक सभागृह देण्यात आले असून दहा वर्षांचे देखभाल-दुरुस्तीचे काम विकासक करणार आहे.
कर्मचारी घरात राहायला गेल्यानंतर दहा वर्षे काही पाहण्याची गरज नाही, अशा पद्धतीने पालिकेने रचना केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सफाई कर्मचारी सर्वांचे आरोग्य उत्तम ठेवतात आणि मुंबई स्वच्छ ठेवतात. त्यामुळे मुंबईकरांना आरोग्य लाभ होतो. मात्र त्यांचे जीवन खुराड्यासारख्या घरांमध्ये होत होते. कल्याणकारी राज्यात, आशियातील संपन्न महापालिकेतील कर्मचारी अशा प्रकारे राहतात, ही भूषणावह बाब नाही, असेही ते म्हणाले.
लाड-पागे समिती आणि इतर योजना
लाड-पागे समिती १९७३ साली तयार झाली होती. नंतरच्या काळात न्यायालयाच्या निर्णयाने समितीचे कामकाज बंद झाले होते. त्यानंतर वारसा पद्धत सुरू झाली आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांना वर्ग तीनमध्ये नोकरी मिळाली. अडचणी आल्यानंतर न्यायालयात लढा देऊन लाड-पागे समिती पुन्हा लागू करण्यात आली. कर्मचाऱ्यांचे वेगळे हक्क अबाधित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच किमान किती वेतन मिळाले पाहिजे, यासंदर्भातही निर्णय घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना आणि वाल्मिकी योजना सुरू करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही योजना करताना आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची मदत केली, असेही ते म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply