सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. एकूण १४६ पैकी तब्बल १०० मते मिळवत त्यांनी जिल्हा बँकेत दणक्यात प्रवेश केला, तर विरोधी उमेदवाराचा दारुण पराभव झाला. मात्र, इतका मोठा विजय मिळवला तेव्हा विजयाचा गुलाल बघायला त्यांचे वडील विलासकाका पाटील उंडाळकर हयात नाहीत, अशी सल त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
सुमारे चार दशकं नेतृत्व करत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आर्थिक शिस्तीच्या जोरावर देशाच्या सहकार क्षेत्रात अग्रेसर ठेवणाऱ्या धुरंधर नेत्याचं नाव म्हणजे लोकनेते विलासकाका पाटील उंडाळकर. सलग ५३ वर्षे ते बँकेचे संचालक होते. त्यांच्या पश्चात झालेल्या निवडणुकीत त्यांचे वारस म्हणून निवडणूक लढविलेल्या उदयसिंह पाटील यांचा निसटता पराभव झाला होता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला.
पाच वर्षांपूर्वीचा पराभव आणि यंदाचा विजय
विलासकाका यांचं ४ जानेवारी २०२१ रोजी निधन झालं. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये जिल्हा बँकेची निवडणूक झाली होती. सलग पन्नास वर्षांहून अधिक काळ नेतृत्व केलेल्या विलासकाकांच्या कराड सोसायटी मतदारसंघातून त्यांचे सुपुत्र उदयसिंह पाटील यांनी निवडणुकीची तयारी केली होती. मात्र, तत्कालीन आघाडी सरकारमध्ये सहकार मंत्री असणाऱ्या बाळासाहेब पाटील यांनी त्यांना आव्हान दिले. अटीतटीच्या लढतीत अवघ्या चार मतांनी उदयसिंह पाटील पराभूत झाले. त्याची सल उंडाळकरांच्या कार्यकर्त्यांना होती.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी उंडाळकर गट गेली पाच वर्षे जोरदार तयारी करत होता. अनेक सोसायटींची सत्ता हस्तगत केली. मध्यंतरी झालेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप आमदार अतुल भोसले यांना उंडाळकर गटाने साथ केली. त्या मदतीची परतफेड करताना अतुल भोसले यांनी आपली मते उंडाळकरांच्या पारड्यात टाकली. त्यामुळे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे गणित बिघडले. विजयासाठीच्या मतांची गोळाबेरीज होत नसल्याने त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.
माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी धनंजय पाटील या उमेदवाराचा अर्ज रिंगणात ठेवून निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत उदयसिंह पाटील यांनी १४६ पैकी १०० मते मिळवून जिल्हा बँकेत दणक्यात प्रवेश केला. विलासकाका हयात असताना उदयसिंह पाटील खरेदी-विक्री मतदारसंघातून संचालक होते. मात्र, वडिलांच्या पश्चात मिळवलेला विजय कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा ठरला आहे. आपल्या मुलाच्या विजयाचा गुलाल पाहिला विलासकाका नाहीत, ही खंत प्रत्येक कार्यकर्त्याला होती.
विलासकाकांचा वारसा
सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा निष्ठावंत आणि पुरोगामी नेता, अशी विलासकाकांची राज्यात ओळख होती. निष्कलंक, स्पष्ट वक्ता आणि कार्यकर्त्यांचं प्रचंड केडर असलेला मास लिडर म्हणून काँग्रेस पक्षात त्यांचा दबदबा होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे सलग सात टर्म ते आमदार होते. १२ वर्षे त्यांनी पशुसंवर्धन, दुग्धविकास, मदत व पुनर्वसन, सहकार, विधी व न्याय खात्याच्या मंत्रिपदांची धुरा सांभाळली.
यशवंतराव चव्हाण, देशभक्त किसन वीर, आर. डी. पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई या धुरिणांच्या पुढाकाराने जिल्हा बँकेची स्थापना झाली. या नेत्यांच्या पश्चात विलासकाका उंडाळकरांनी बँकेचे नेतृत्व केले. अखेरपर्यंत त्यांनी विश्वस्त म्हणूनच काम केले. अनेकांवर विश्वास टाकून बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. कायम शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिलं. मतदारसंघातील तरूणांना एक रूपया न घेता बँकेत नोकरी लावली. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’, हे व्रत त्यांनी अखेरपर्यंत जपले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply