देशभरात भाजपकडून लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव ही पदयात्रा काढली जात आहे. नागपूरमध्ये झालेल्या या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
संविधानासाठीची लढाई असल्याचा दावा
ही लढाई देशाच्या संविधानासाठी आहे. जे षडयंत्र सुरू आहे, ते चांगलं नाही. आम्ही रस्त्यावर उतरूनही ही लढाई लढण्यास तयार आहोत. तुम्ही हजार असाल तर आम्ही लाख येऊ, असं फडणवीस म्हणाले. विरोधक सत्ता परिवर्तनाच्या नावाखाली देशात डावी व्यवस्था आणू पाहत आहेत, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांना भारतात बांगलादेश आणि नेपाळसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे, असंही ते म्हणाले. एका हातात संविधान आणि दुसऱ्या हाताने संविधानविरोधी काम, असा हल्लाबोल त्यांनी केला.
१९७५ चा उल्लेख आणि राहुल गांधींवर निशाणा
१९७५ मध्ये काँग्रेसने देशाचं संविधान बदलण्याचं काम केलं होतं, असं फडणवीस म्हणाले. संविधानाने मूलभूत अधिकार दिले आहेत, पण संविधानाची मोडतोड करणारे काँग्रेसच आहे, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांना उद्देशून ते म्हणाले की, जे तुमच्या आजीला जमलं नाही, ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात. ज्या बांगलादेशी लोकांच्या भरवशावर हे निवडून येत होते, ते आता इथून पुढे मतदान करणार नाहीत, म्हणून यांना मळमळ होत आहे, असंही फडणवीस म्हणाले. इथे एकाही बांगलादेशी नागरिकाला राहू देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply