बुलढाणा जिल्ह्यात येत्या काळात पाणीटंचाई आणि चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रशासनाला दिले आहेत. पशुधनासाठी आतापासूनच चाऱ्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणीटंचाई व चारा व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, माजी आमदार संजय रायमुलकर तसेच जलसंधारण, मृद व जलसंधारण, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेऊन आगामी काळातील संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
चारा लागवडीसाठी बियाण्यांचे वाटप
केंद्र पुरस्कृत ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारा लागवड करावी, असे जाधव म्हणाले. पशुसंवर्धन विभागामार्फत चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. या बियाण्यांची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे किंवा नाही, याची माहिती कृषी सहाय्यक व तलाठ्यांमार्फत संकलित करावी. चारा लागवड झालेल्या क्षेत्राची तालुकानिहाय माहिती आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामस्तरावर चारा लागवडीचे नियोजन करून भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
चारा व्यवस्थापन आणि जलसंधारणावर भर
खरीप हंगामात पावसाची झालेली तूट आणि त्याचा पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम लक्षात घेता चारा व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे लागणार आहे. खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहणारे सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार तसेच अन्य पिकांचे अवशेष गोळा करून त्यांचा पशुखाद्य म्हणून वापर करावा. उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पशुपालकांना मार्गदर्शन करावे. चारा संवर्धन, मुरघास निर्मिती, चाऱ्याची योग्य साठवणूक आणि पीक अवशेषांचे पोषणमूल्य वाढविण्याबाबत प्रशिक्षण व जनजागृती करावी, असे जाधव म्हणाले. पशुधनाची संख्या आणि उपलब्ध चाऱ्याचा साठा लक्षात घेऊन भविष्यातील गरजेनुसार नियोजन करावे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीसह अन्य चारा पिकांची लागवड करावी. आगामी काळात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच आवश्यक पूर्वतयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुकास्तरावर विविध विभागांनी समन्वयाने जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. नद्यांचे खोलीकरण, तलावांतील गाळ काढणे, नाले खोलीकरण, पांदण रस्त्यांची निर्मिती, शेततळ्यांची निर्मिती तसेच माथा ते पायथा जलसंधारणाची कामे यांचे सूक्ष्म नियोजन करावे. उपलब्ध योजनांच्या माध्यमातून ही कामे प्रभावीपणे राबवून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात अडविणे व जमिनीत जिरविण्यावर भर द्यावा, असेही जाधव म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply