शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ७.६९ लाख दिवाळी शिधा किट्स

२७८ तालुक्यांमधील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिवसेनेकडून ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधा किट्स देण्यात येत आहेत. ५ लाख ३८ हजार ५०० किट्स वितरित झाली आहेत.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ७.६९ लाख दिवाळी शिधा किट्स

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना शिवसेनेकडून ७ लाख ६९ हजार दिवाळी शिधा किट्स देण्यात येत आहेत. त्यापैकी ५ लाख ३८ हजार ५०० किट्स देण्यात आली असून उर्वरित किट्स दोन दिवसांत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते, माजी खासदार आनंद परांजपे यांनी दिली. मराठवाडा, नाशिक, पुणे, अमरावती आणि नागपूर भागातील २७८ तालुक्यांमधील शेतकरी कुटुंबांना ही किट्स देण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे निर्देश दिले असून येत्या तीन दिवसांत शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचतील, असे परांजपे म्हणाले. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परांजपे म्हणाले की, १९७२ नंतर महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला असून राज्यातला शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेऊन शेतकऱ्यांना भरीव मदतीची मागणी केली होती. त्यानंतर राज्यात केंद्रीय पथकं आली आणि त्यांनी दुष्काळाची पाहणी केली. दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली होती.

विभागनिहाय वितरण; उसतोड कामगारांनाही किट्स

शिवसेनेने आतापर्यंत मराठवाड्यात १ लाख ७७ हजार, नाशिक विभागात १ लाख ३५ हजार, पुणे विभागात ८२ हजार, अमरावती विभागात ७७,५०० आणि नागपूर विभागात ६६ हजार दिवाळी शिधा किट्स वितरित केले आहेत. तसेच १० हजार उसतोड कामगारांनाही दिवाळी शिध्याचे किट्स दिले आहेत. कोकणात शेवटच्या टप्प्यात किट्स वितरित होतील, अशी माहिती परांजपे यांनी दिली. राज्य सरकारने ३५८ तालुक्यांपैकी ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यातील २७८ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना शिवसेनेने दिवाळी शिधा दिला आहे. दसऱ्याच्या दिवशी ठाण्यातून ६० ट्रक आणि मुंबईतून ४० ट्रक दिवाळी शिधा रवाना केला होता. शिवसेना डॉक्टर सेलच्या माध्यमातून गरिबांना ५ हजार दिवाळी शिधा दिला जाणार आहे.

शाखा बनणार शेतकरी सेवा केंद्र

यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसोबत साजरी करायची, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या सर्व मंत्री, आमदार आणि खासदारांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या पत्नींना आणि माता-भगिनींना २५ हजार शिलाई मशीन आणि मुलींना २५ हजार सायकलींचे वितरण पक्षाकडून करण्यात आले आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी मुलीच्या विवाहाची चिंता करू नये; डिसेंबर महिन्यानंतर शिवसेनेकडून सामूदायिक विवाह सोहळे आयोजित केले जातील. त्याबाबत शेतकऱ्यांनी जिल्हा प्रमुखांकडे नोंदणी करावी, असे परांजपे म्हणाले. दुष्काळग्रस्त भागातील शिवसेनेच्या शाखा या शेतकरी सेवा केंद्र म्हणून काम करतील. यातून शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांची माहिती, मनरेगा नोंदणी आणि पंचनाम्यातील अडचणी सोडवण्यात मदत मिळेल. केवळ दिवाळीपुरता नाही तर पुढच्या पावसाळ्यापर्यंत शिवसेनेकडून शेतकऱ्यांसाठी मदतीचे उपक्रम राबवले जातील, असेही परांजपे म्हणाले.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance